

सांगली ः महापालिका निवडणुकीत भाजपने घेतलेल्या सोयीस्कर भूमिकेचा विचार करून आम्ही जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेबाबत आमचे आम्ही ठरवूच. सत्तास्थापनेबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यांनी आमचा पाठिंबा गृहित कसा धरला? गरज भासली की त्यांच्याकडून अशा चर्चा होतात, पण आमचा निर्णय ठरविणारा भाजप कोण? आम्ही स्वतंत्र लढलो आहे, असे शिवसेनेचे नेते, जिल्हा संपर्क प्रमुख व ना. शंभूराज देसाई यांनी पत्रकारांना सांगितले.
सांगली येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार मंत्री देसाई यांच्याहस्ते करण्यात आला, यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, महानगरपालिकेत सत्तास्थापनेबाबत आमच्याबरोबर बोलणे झाले. पण नंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला बरोबर घेण्यात आले. हा पक्ष देखील महायुतीतील घटकपक्ष आहे. आम्हाला काही अडचण नाही. पण नगरपालिका व महापालिका निवडणुकीत महायुतीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत टोकाची भूमिका घेऊ नये, असे जाहीर केले होते. ते भाजपकडून सांगली महापालिकेसाठी पाळले गेले नाही. हा अनुभव आता शिवसेनेला आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सत्तेत भाजपबरोबर सहभागी व्हायचे की नाही, याचा निर्णय शिवसेना सर्वांनुमते घेणार आहे. यावेळी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, संजय विभुते मोहन वनखंडे, गौरव नायकवडी, नगरसेवक युवराज बावडेकर, हरिदास लेंगरे, अमोल पाटील आदी उपस्थित होते.