

सांगली : माजी मुख्यमंत्री पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या पत्नी, माजी महसूलमंत्री शालिनीताई पाटील यांचे शनिवारी निधन झाले. शालिनीताई यांचे सांगली जिल्ह्यातील राजकारणात, सहकार, समाजकारणात भरीव योगदान होते. सांगलीच्या आमदार, खासदार, तसेच राज्याच्या मंत्रिमंडळात महसूलमंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. जिल्ह्यातील त्या पहिल्या महिला मंत्री होत्या. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या राजकारणात शालिनीताई यांची मोठी साथ लाभली.
शालिनीताई या उच्चशिक्षित, धाडसी, कणखर नेत्या होत्या. त्यांनी आपल्या ठाम निर्णयक्षमतेने आणि व्यक्तिमत्त्वाने महाराष्ट्राच्या राजकारणात छाप पाडली. वसंतदादा पाटील यांच्या पत्नी म्हणून राजकारणात त्यांचा दबदबा होता. 1980 मध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातून वसंतदादा पाटील विजयी झाले, तर 1980 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत सांगली मतदारसंघातून शालिनीताई पाटील विजयी झाल्या. शालिनीताई यांनी काँग्रेस (एस)चे नामदेवराव मोहिते यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या मंत्रिमंडळात शालिनीताई पाटील यांना महसूलमंत्री पदाची संधी मिळाली. महसूलमंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला.
दरम्यान, 2 फेब्रुवारी 1983 रोजी वसंतदादा पाटील तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. खासदारकीचा राजीनामा देऊन ते पुन्हा राज्याच्या सत्तेत आले. शालिनीताई पाटील यांनीही वसंतदादांसाठी सांगली विधानसभेच्या आमदारकीचा राजीनामा दिला. सांगली विधानसभा आणि सांगली लोकसभेची पोटनिवडणूक लागली. 1983 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत सांगली विधानसभा मतदारसंघातून वसंतदादा विजयी झाले, तर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत सांगलीतून शालिनीताई खासदार झाल्या. वसंतदादांच्या पत्नी म्हणून सांगली जिल्ह्याच्या राजकारणात, सहकार, समाजकारणात शालिनीताई यांचा चांगलाच दबदबा होता. त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात, सहकारात मोठे योगदान दिले.
सांगलीत सुरू झालेल्या लक्ष्मी महिला सहकारी बँकेच्या शालिनीताई संस्थापक-अध्यक्षा होत्या. महिला सहकारी बँकेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे पाऊल त्यांनी उचलले. ताकारी-म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू करण्यात वसंतदादांचे मोठे योगदान आहे. त्यामध्ये त्यांना शालिनीताई यांचीही साथ लाभली. वसंतदादा पाटील हे चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. दि. 17 एप्रिल 1977 ते दि. 6 मार्च 1978, दि. 7 मार्च 1978 ते 17 जुलै 1978, दि. 2 फेब्रुवारी 1983 ते 9 मार्च 1985, दि. 10 मार्च 1985 ते दि. 1 जून 1985 या कालावधीत वसंतदादा मुख्यमंत्री होते. वसंतदादा मुख्यमंत्री होण्यात शालिनीताई पाटील यांची साथ मोलाची ठरली.
वसंतदादांच्या निधनानंतर सांगली जिल्ह्यात प्रकाशबापू पाटील यांचे नेतृत्व पुढे आले. शालिनीताई पाटील जिल्ह्याच्या राजकारणातून बाजूला गेल्या, मात्र त्यांनी आपल्या राजकारणाचे, सहकार, समाजकारणाचे काम सातारा जिल्ह्यातून सुरू ठेवले. शालिनीताई पाटील यांचे शनिवार,दि. 20 डिसेंबर 2025 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.