

सोनी : नागपूर - रत्नागिरी महामार्गावर मेंढ्यांच्या कळपात ट्रॅव्हल्स बस शिरल्यामुळे सहा मेंढ्या व एक शेळी जागीच ठार झाली, तर पाच-सहा मेंढ्या जखमी झाल्या आहेत. कोल्हापुरातून पावसाळ्यात जनावरे चारण्यासाठी आलेल्या मेंढपाळावर काळाने घाला घातला आहे.
नागपूर - रत्नागिरी महामार्गावर भोसे येथील यल्लमा मंदिराच्या जवळच कोल्हापूर जिल्ह्यातील सिध्दराम ढोणे (रा. मळगे, ता. कागल) हे आपल्या सहकार्यांसमवेत मेंढ्या घेऊन सोलापूर जिल्ह्यात चारण्यासाठी चालले होते. महामार्गावर विरुद्ध दिशेने ते चालले होते. सकाळी ट्रॅव्हल्स बस (डीडी 01, एक्स 9797) चालक विशाल सुरेश माने याने सरळ बस मेंढ्यांच्या कळपात नेली. यामध्ये सहा मेंढ्या व एक शेळी जागीच ठार झाली, तर पाच ते सहा मेंढ्या जखमी झाल्या. मेंढपाळ महामार्गावर विरुद्ध दिशेने येत असल्याने मेंढ्यांच्या कळपात सरळ गाडी घुसली. पण त्याचक्षणी मेंढपाळ बाजूला झाले, त्यामुळे त्यांचा जीव वाचला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.