

ईश्वरपूर : दिव्यांगांसाठीच्या विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यास प्राधान्य देण्यात येणार असून स्वतंत्र दिव्यांग भवन स्थापन केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी दिली.
राष्ट्रीय अपंग विकास महासंघ महाराष्ट्र राज्याच्यावतीने जिल्हा परिषद, सांगली येथे दिव्यांगांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा आयोजित करण्यात आली होती. या चर्चेत ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावर दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या पाच टक्के निधीचा वेळेवर व रोख स्वरूपात खर्च व्हावा, तीन चाकी इलेक्ट्रिक सायकलींचे वाटप करावे, तसेच व्यवसायासाठी पाच टक्के गाळे उपलब्ध करून द्यावेत, अशा मागण्या मांडण्यात आल्या. दिव्यांग घरकुल योजना अधिक व्यापक पद्धतीने राबवून पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा, तसेच प्रत्येक शासकीय कार्यालयात दिव्यांगांसाठी स्वतंत्र कक्ष प्रारंभ करावा, असेही त्यांनी सांगितले.
दिव्यांग शासकीय कर्मचाऱ्यांना सहाय्यक तंत्रज्ञान उपकरणे देण्यासाठी लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दिव्यांगांसाठीच्या सर्व शासकीय योजनांची माहिती प्रत्येक कार्यालयात ठेवण्यात येणार असून, त्यांच्या समस्या वेगाने सोडवून जास्तीत जास्त लाभ देण्याचा निर्धार नरवाडे यांनी व्यक्त केला.