सांगलीतील थरारक चोरीचा 4 तासांत छडा

चोरीतील 13 तोळे सोने हस्तगत; पतसंस्थेसमोर ज्येष्ठ नागरिकाकडील सोन्यावर मारला होता डल्ला
Sangli News
सांगलीतील थरारक चोरीचा 4 तासांत छडा
Published on
Updated on

सांगली : पतसंस्थेच्या लॉकरमध्ये सोने ठेवण्यासाठी आलेल्या ध्यानचंद्र सकळे (वय 87, रा. पत्रकारनगर, सांगली) या ज्येष्ठ नागरिकाच्या 13 तोळे सोन्यावर चोरट्याने भरदिवसा डल्ला मारला. या थरारक घटनेमुळे शहरात खळबळ उडालेली; मात्र पोलिसांनी चार तासांत या चोरीचा छडा लावला. फिर्यादीच्या वाहन चालकासह दोघांना अटक केली. अमोल महेश माने (30, रा. शिवपार्वती कॉलनी, हरिपूर) आणि नीतेश रामचंद्र गजगेश्वर (29, रा. हरिपूर रस्ता, सांगली) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीतील दागिने हस्तगत केले. ही माहिती प्रभारी पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सांगलीतील व्यापारी ध्यानचंद्र सकळे यांच्या घरी लग्नकार्य होते. त्यामुळे त्यांनी 29 एप्रिलरोजी कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेमधील लॉकरमध्ये ठेवलेले 40 तोळे सोने काढले होते. लग्नकार्य आटोपल्यानंतर ध्यानचंद्र सकळे सोने परत ठेवण्यासाठी शुक्रवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोटारीमधून कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेमध्ये येणार होते. यावेळी अवघ्या दोन महिन्यांपूर्वी त्यांच्याकडे चालक म्हणून कामासाठी आलेला नीतेश गजगेश्वर त्यांच्यासोबत मोटारीत होता. पतसंस्थेसमोर सकळे मोटारीतून उतरताच तेथे दुचाकीवर दबा धरून थांबलेल्या अमोल माने याने सकळे यांच्या हातातील सोने असलेल्या पिशवीला हिसडा मारून पलायन केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक विमला एम., विश्रामबागचे पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्यासह पथक, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर चोरट्याच्या शोधासाठी वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली. तपासादरम्यान पतसंस्थेच्या बाहेर असणार्‍या सीसीटीव्ही कॅमेर्‍याची तपासणी केली असता सकळे मोटारीतून उतरताच चालकाने मोटार तातडीने पुढे घेतली, यानंतर लगेचच पाठीमागे थांबलेल्या दुचाकीस्वाराने पिशवीला हिसडा मारून पलायन केल्याचे चित्रीकरण झाले होते. त्यामुळे सकळे यांच्या चालकावर संशय बळावला. त्याला तातडीने ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, चालक नीतेश गजगेश्वर याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने मित्र अमोल याच्या मदतीने चोरीचा प्लॅन आखल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी अमोल यालाही अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने शहरातील पटेल चौक रस्त्यावर एका टेम्पोमध्ये चोरीचे सोने ठेवल्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीने धाव घेत टेम्पोमध्ये ठेवलेले 13 तोळे सोने हस्तगत केले. तसेच चोरीमध्ये वापरलेली दुचाकी व मुद्देमाल लपविण्यासाठी वापरलेला टेम्पोदेखील जप्त केला. विश्रामबाग पोलिस ठाण्याकडील प्रशांत माळी, योगेश पाटील, गणेश बामणे, आर्यन देशिंगकर, महंमद मुलाणी, संपत साळुंखे आणि विशाल भिसे यांच्या पथकाने या चोरीचा छडा लावण्यात महत्त्वपूर्ण काम केले.

प्रत्येक क्षणाची मोबाईलवरून माहिती

सकळे घरातून बाहेर पडल्यापासून चालक नीतेश मोबाईवर बोलत होता. तो कोणाशी बोलत होता, याची कल्पना मात्र ध्यानचंद्र यांना नव्हती. परंतु तो ‘मोघम’ बोलत प्रत्येक क्षणाची माहिती मोबाईलवरून अमोलला देत होता.

चाळीस तोळे असे ऐकले, अन्

चालक नीतेश याच्यासमोर सकळे यांच्या पत्नीने ‘सोने लॉकरला ठेवून या, घरात कशाला ठेवायचे एवढे चाळीस तोळे सोने ?’ असे म्हटले होते. चाळीस तोळे सोने असल्याचे कानावर पडताच नीतेशची लालसा जागी झाली. त्यानंतर त्याने मित्राच्या मदतीने ही चोरी केली.

पोलिस भरती ते थेट ‘बॅग लिफ्टिंग’

मुख्य संशयित अमोल माने हा लोहमार्ग पोलिस भरतीसाठी प्रयत्न करीत होता. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे त्याची भरतीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नव्हती. त्यामुळे पोलिस भरतीची तयारी करणारा अमोल मित्राच्या सांगण्यावरून धाडसी चोरीत सहभागी झाला आणि थेट सोने चोरीच्या गुन्ह्यात अडकला.

आदल्या दिवशी डाव फसला, दुसर्‍या दिवशी साधला

ध्यानचंद्र सकळे यांच्या मोटारीवर नीतेश गजगेश्वर हा दोन महिन्यापूर्वी चालक म्हणून आला होता. सकळे यांनी लग्नकार्यासाठी सोने आणल्याची त्याला कल्पना होती. गुरुवारी सकळे सोने ठेवण्यासाठी आले होते. पण यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नीही सोबत होती. परंतु पतसंस्थेस सुट्टी होती. त्यामुळे हा प्लॅन फसला. शुक्रवारी मात्र सकळे एकटेच आल्याने त्याने मित्र अमोलच्या मदतीने डाव साधला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news