
सांगली : आगामी शैक्षणिक वर्षात उन्हाळ्याची सुटी संपून दि. 16 जूनरोजी शाळा सुरू होत आहेत. यासाठी 16 ते 30 जून या कालावधीत जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम प्रभावीपणे साजरा होत आहे. 6 ते 14 वर्षे वयोगटांतील सर्व मुलांना (दिव्यांग मुलांसह) शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी दिली.
नव्याने प्रवेशित होणार्या बालकांच्या स्वागतासाठी जिल्ह्यात 100 शाळांना भेटी देणे हा उपक्रम राबविण्यात येत असून, यामध्ये लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी शाळांना भेटी देणार आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ उत्साह, चैतन्य व आनंदमयी होईल अशा पध्दतीने शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्व शाळा दि. 16 जूनरोजी सुरू होणार असून दाखलपात्र मुलांची यादी तयार करून शाळा फलकावर, ग्रामपंचायत येथे दर्शनी भागात तसेच गावातील प्रमुख चौकातील फलकावर ही यादी लावून मुलांना शाळेत दाखल करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विशेष गरजा असणार्या प्रत्येक बालकास शाळेत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. शाळा प्रारंभ दिनापूर्वी शाळा व्यवस्थापन समितीची बैठक आयोजित करण्यात येणार आहे.
शाळा सुरू होण्यापूर्वीर गावात दवंडी देण्यात येणार आहे. शाळा सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर स्थानिक पातळीवर शिक्षकांमार्फत गृहभेटी देण्यात येतील. शालेय परिसर स्वच्छता करून सडा-रांगोळी काढण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा व परिसराची सजावट करून तोरण बांधून गावातील लोकप्रतिनिधी, माजी विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, स्थानिक शासकीय अधिकारी यांच्या सहभागाने पारंपरिक वेशभूषेत, पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करून त्यांना सवाद्य मिरवणुकीने शाळेत आणण्यात येणार आहे. बालकांना गोड खाऊ वाटप करण्यात येणार आहे. जेणेकरून नवागतांचा उत्साह वाढेल व त्यांच्यामध्ये शाळेबद्दल ओढ निर्माण होईल. सदर शाळांना वर्षभरात वेळोवेळी भेटी देऊन विद्यार्थी गुणवत्ता व शाळेच्या भौतिक सुविधा यांचा आढावा घेऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.