

कडेगाव शहर : विजयमाला पतंगराव कदम सह्याद्री देवराई देशात आदर्श ठरेल, भारतातील नव्हे तर जगातील विद्यापीठातील विद्यार्थी याठिकाणी येतील व त्याचा आदर्श घेतील, असा विश्वास सह्याद्री देवराईचे अध्यक्ष व प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला.
कडेगाव येथील लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर भारती विद्यापीठ व सह्याद्री देवराई यांच्या वतीने भव्यदिव्य असे जैवविविधता उद्यान साकारण्यात येत आहे, त्याची पाहणी करण्यासाठी सह्याद्री देवराईचे अध्यक्ष व प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
सयाजी शिंदे म्हणाले, मी आई मध्ये झाड बघतो, आईचे अस्तित्व हजारो वर्षे जिवंत ठेवण्यासाठी विजयमाला कदम यांची आपण 26 एप्रिल 2028 रोजी बीजतुला केली असून त्यामधून संकलित झालेल्या बियांतून आपण याठिकाणी भव्यदिव्य अशी देवराई साकारत आहोत. भारती विद्यापीठाची देवराई ही आईसाठी लावलेले अजरामर व ऐतहासिक असे स्थळ बनेल. यावेळी समन्वयक डॉ. तेजस्विनी बाबर, डॉ. सुहास वायंगणकर, डॉ. धनंजय पाटील प्राचार्य डॉ. ए. डी. जाधव, उपप्राचार्य डॉ. युवराज जाधव, सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी सयाजी शिंदे म्हणाले, भारती विद्यापीठाच्या लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर भारती विद्यापीठ व सह्याद्री देवराई यांच्या वतीने भव्य अशी देवराई साकारण्यात येत आहे, ही देवराई अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी असेल याठिकाणी 1 हजारपेक्षा जास्त प्रजातीची झाडे असतील. वेगवेगळ्या प्रकारचे वेली, झुडपे, गवते त्याचबरोबर पंचवटी, त्रिवेणी, सप्तर्षी उद्यान, औषधी उद्यान, फुलपाखरू उद्यान नक्षत्र वन अशा अनेक प्रकारचे व अतिशय वेगळ्या पॅटर्नची देवराई याठिकाणी होत असून अशी देवराई कुठेच नसेल.