Sindhudurg News
सावंतवाडीत लवकरच साकारणार ‌‘खाऊ गल्ली‌’

Sindhudurg News : सावंतवाडीत लवकरच साकारणार ‌‘खाऊ गल्ली‌’

उद्यानातील जुनी खेळणी बदलणार ः मोहिनी मडगावकर
Published on

सावंतवाडी ः सावंतवाडी शहराच्या पर्यटन वैभवात भर टाकण्यासाठी आणि स्थानिक महिला व सुशिक्षित बेरोजगारांना हक्काचा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेतर्फे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात येणार आहे. पालिकेच्या गोदामामागे असलेल्या आठवडा बाजाराच्या रिकाम्या जागेत लवकरच खाऊ गल्ली उभारण्याचा मानस पालिकेच्या नवनिर्वाचित उद्यान व पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर यांनी व्यक्त केला. सभापती पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मोहिनी मडगावकर यांनी गुरुवारी शहरातील जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान आणि परिसराची पाहणी केली, त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मोहिनी मडगावकर म्हणाल्या, शहरात अनेक युवक व महिला बेरोजगार आहेत, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या हेतूने आठवडा बाजाराच्या जागेचा वापर केला जाणार आहे. हा बाजार दर मंगळवारी भरतो, मात्र अन्य वेळी ती जागा रिकामी असते. त्यामुळे आठवड्याच्या बाजारी व्यापाऱ्यांना सुट्टी देऊन त्या ठिकाणी खाऊ गल्ली यशस्वी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून रोजगाराचे नवीन दालन उभे राहील. यासाठी पालिकेच्या आगामी बैठकीत योग्य तो ठराव घेऊन निर्णय घेतला जाईल. उद्यानाच्या दुरवस्थेबाबत त्या म्हणाल्या, जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानातील जुनी खेळणी सध्या धोकादायक स्थितीत आहेत. मुलांच्या सुरक्षेचा विचार करून ही खेळणी बदलण्यासाठी तातडीने पाठपुरावा केला जाणार आहे. उद्यानाशेजारी असलेला धोकादायक नाला स्लॅब टाकून बंदिस्त करण्यात येईल.

शहराच्या समृद्ध संस्कृतीला साजेसा एक आकर्षक सेल्फी पॉईंट उभारला जाईल. महामार्ग आणि रेल्वे शहराच्या बाहेरून गेल्यामुळे पर्यटक शहराकडे वळत नाहीत. यामुळे स्थानिक हॉटेल व्यवसाय आणि उद्योगधंदे अडचणीत आले आहेत. यापुढे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आगामी काळात ठोस धोरण राबवले जाईल. पालकमंत्री नितेश राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांच्यासह सर्व वरिष्ठ नेत्यांना विश्वासात घेऊन शहराच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news