

सांगली : सावळज (ता. तासगाव) येथे अधिकाऱ्यांना शक्तिपीठ महामार्गासाठी जमिनीची मोजणी करताच आली नाही. एकही शेतकरी मोजणीसाठी समर्थन देत नसल्याने अधिकाऱ्यांना मोजणी न करताच रिकाम्या हाताने परतावे लागले.
शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, या मागणीसाठी गेल्या दीड वर्षापासून शेतकऱ्यांनी विरोध चालविला आहे. सावळज येथे यापूर्वीही अधिकारी मोजणीसाठी आले असताना शेतकऱ्यांनी प्रखर विरोध करीत मोजणी रोखली होती. शेतकऱ्यांनी मोजणी अधिकाऱ्यांसमोर बोंबाबोंब आंदोलन केले होते. तसेच हातात दांडके घेऊन अधिकाऱ्यांसमोर आंदोलन केले होते. एक इंचही जमीन शक्तिपीठ महामार्गासाठी द्यायची नाही, असा पवित्रा बाधित शेतकऱ्यांनी घेतला आहे.
सोमवारी डोंगरसोनी येथेही महामार्ग मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी विरोध केला. यानंतर मंगळवारी सावळज येथेही शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने अधिकाऱ्यांना मोजणी करता आली नाही. शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे, यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गबाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष दिगंबर कांबळे, राज्य संपर्क प्रमुख शरद पवार, राज्य प्रवक्ते दत्तात्रय पाटील, रमेश कांबळे, सुनील कांबळे, संतोष पाटील, प्रदीप इसापुरे, सर्जेराव बुधवले, बाळासाहेब गोसावी, महादेव देसाई, बबन मंडले, लक्ष्मण कांबळे उपस्थित होते.