

शिराळा शहर : वन विभागाने शेतात व मानवी वस्तीमध्ये वावर असणार्या बिबट्यांना पकडण्यासाठी आवश्यक परवानगी घेऊन, त्यांचा बंदोबस्त करावा, तसेच पशुधनावर हल्ला केल्यावर तत्काळ पंचनामा करून संबंधित शेतकर्यांना भरपाई मिळावी. नियमांची आडकाठी न आणता अधिकार्यांनी संवेदनशीलपणे काम करावे. वन्यप्राण्यांकडून शेती पिकाचे होणारे नुकसान रोखणे आवश्यक आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी कुंपण व चर मारण्याचा प्रस्ताव तयार करा, असे आदेश आमदार सत्यजित देशमुख यांनी दिले.
शिराळा तहसील कार्यालयात वन्यप्राण्यांकडून होणारे नुकसान, बिबट्यांचे जनावरांवर व नागरिकांवर हल्ले, याप्रश्नी वन व महसूल विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. उप वनसंरक्षक सागर गवते, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, शिराळा तहसीलदार शामला खोत-पाटील, वाळव्याचे तहसीलदार सचिन पाटील, शिराळ्याचे वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी, माजी सभापती हणमंतराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य के. डी. पाटील, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील, सम्राटसिंह शिंदे, भाजप तालुकाध्यक्ष सत्यजित पाटील आदी उपस्थित होते. आमदार देशमुख म्हणाले, शिराळा व वाळवा परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. याबाबत उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासंबंधित परवानगी घेण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव द्यावेत. बिबट्याचे जनावरांवर व नागरिकांवर सातत्याने हल्ले होत आहेत. बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात. पशुधनावर हल्ला झाल्यानंतर तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई संबंधित शेतकर्यांना मिळावी. या बाबतीत प्रशासनाने संवेदना ठेवून काम करावे. कायद्यावर बोट ठेवून शेतकर्यांना त्रास देऊ नये.
यावेळी बाजीराव शेडगे, मनोज चिंचोलकर, शहाजी बोबडे, सुदाम पाटील, बी. के. पाटील, नीलेश पाटील, सचिन माने, बाजीराव सपकाळ, शंकर वाघ, पृथ्वी शिंदे, प्रजित यादव आदी उपस्थित होते.