Shirala Nagpanchami | शिराळ्याच्या नागपंचमीसाठी परवानगी मिळावी : सत्यजित देशमुख

गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी
Shirala Nagpanchami |
नवी दिल्ली : येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आमदार सत्यजित देशमुख यांनी भेट घेतली.Pudhari Photo
Published on
Updated on

शिराळा शहर : शिराळ्याच्या जगप्रसिद्ध नागपंचमीस गतवैभव प्राप्त व्हावे, नागपंचमीदिवशी जिवंत नागाची पूजा करण्याची परवानगी मिळावी, अशी शिराळावासीयांची लोकभावना आहे. त्याचा आदर करत केंद्र सरकारने वन्यजीव कायद्यामध्ये खास बाब म्हणून सुधारणा करून पारंपरिक पद्धतीने नागपंचमी साजरी करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार सत्यजित देशमुख यांनी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे केली.

नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांना शिराळा विधानसभा मतदारसंघातील विविध मागण्यांबाबतचे निवेदन देशमुख यांनी दिले. देशमुख म्हणाले, शिराळा येथील नागपंचमीस गतवैभव प्राप्त व्हावे, नागपंचमीदिवशी जिवंत नागाची पूजा करण्याची परवानगी मिळावी, अशी भावना नागप्रेमींची आहे. यासाठी खासदार धैर्यशील माने, विधानपरिषदेचे आमदार सदाभाऊ खोत, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासह सतत पाठपुरावा सुरु ठेवला आहे.

लोकभावनेचा आदर करत केंद्र सरकारने वन्यजीव कायद्यामध्ये खास बाब म्हणून सुधारणा करावी. परंपरेप्रमाणे नागपंचमी साजरी करण्यासाठी प्रयत्न करावा. घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारानुसार प्रत्येकाला धर्म, रुढी परंपरा, धार्मिक कार्य पालन करण्याचा अधिकार आहे. त्या माध्यमातून नागपंचमी ही हिंदू धर्म, रुढी, परंपरांप्रमाणे साजरी करून मूलभूत अधिकार जपावे. अशी विनंती केली. तसेच प्रसिद्ध मराठी साहित्यिक, लोककवी, समाजसुधारक, दलित चळवळीचे अग्रगण्य नेते, ज्यांनी शाहिरी व पोवाड्याच्या माध्यमातून आपली लोककला साता समुद्रापार पोहोचवली, दलित, अधिपतीत, उपेक्षित समाजघटकांच्या व्यथा पोवाड्याच्या माध्यमातून मांडल्या. ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी महत्त्वाची भूमिका मांडली, असे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी विनंती केली.

त्याचबरोबर 2026 मध्ये नाशिक येथे महाकुंभमेळा होणार आहे. या कुंभमेळ्यानंतर शिराळा येथील गोरक्षनाथ मंदिरात नाथपंथीय साधू येत असतात. यासाठी सुविधा देण्यासाठी काही अडचणी आहेत, त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत. शिराळा येथील एमआयडीसीमध्ये उद्योग-व्यवसाय उभारणीसाठी सहकार्य करावे. जेणेकरून येथील तरुणांना शाश्वत रोजगार उपलब्ध होईल. शिराळा मतदार संघातून जाणार्‍या पेठ- कोकरूड - मलकापूर - अनुस्कुरा घाट जोडणार्‍या या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्यावा. या मार्गावरून प्रवासी, पर्यटकांना गोवा, मुंबईकडे जाणे सोयीचे होईल, असा विविध मागण्या देशमुख यांनी केल्या. यावर अमित शहा यांनी सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news