

मसूर ः खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात भरधाव वेगातील चारचाकीची ॲपेरिक्षाला जोरदार धडक बसली. मसूर (ता. कराड) येथील पोस्ट कार्यालयानजीक झालेल्या या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर अन्य सात महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
रेश्मा रमजान मुजावर (वय 53, रा. खडकपेठ, मसूर) असे मृत महिलेचे नाव आहे. जिजाबाई रघुनाथ जाधव, शाहिदा सिकंदर शेख (वय 50), अलका सदाशिव जाधव, सविता मारुती शिरतोडे, मंगल दिलीप जाधव, पाकीजा फिरोज शेख (29) आणि ज्योती नितीन जाधव (सर्व रा. मसूर) या सात महिला गंभीर जखमी झाल्या.
संतप्त नागरिक पोलिस ठाण्यात
या अपघातानंतर ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत नागरिकांनी मोर्चा मसूर पोलिस ठाण्याकडे वळविला. कारवाई न झाल्यास मृतदेह पोलिस ठाण्याच्या आवारातच दफन करू अशी भूमिका नागरिकांनी घेतली. यामुळे काहीकाळ निर्माण झालेला तणाव पोलिस अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर निवळण्यास मदत झाली.