

सातारा : जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाची कामे करण्यासाठी शासनाला भरावयाची सुरक्षा रक्कम न भरता, आर्थिक फायद्यासाठी जाणीवपूर्वक जिल्हा परिषदेची फसवणूक केली. यासाठी बँकेचा बनावट रिसिव्हड शिक्का, कॅशिअरची खोटी सही केल्याप्रकरणी २ ठेकेदारांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. २८ लाख रुपयांचा हा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे.
योगेश रवींद्र बर्गे (वय ५१, रा. शिंदेवाडी, ता. फलटण), विजय बापूसाहेब घाडगे (रा. संभाजीनगर एमआयडीसी, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्या ठेकेदारांची नावे आहेत. याप्रकरणी जिल्हा जलसंधारण अधिकारी अरुणकुमार संभू दिलपाक (रा. सदरबझार, सातारा) यांनी तक्रार दिली आहे.
दै. ‘पुढारी’ने लघु पाटबंधारेत अनामत रक्कम चलनात घोटाळा झाल्याचे उघडकीस आणले होते. तसेच याबाबत पाठपुरावा केल्यामुळे या प्रकरणाची जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सीईओ यांनी दखल घेतली होती. या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने समिती गठीत करून लघुपाटबंधारेसह सर्वच विभागांची चौकशी लावली. याप्रकरणी दोन कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई केली होती. याचबरोबर सीईओ याशनी नागराजन यांनी बैठक घेऊन संबंधित ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार फिर्याद देण्यात आली. यावरून योगेश रवींद्र बर्गे व विजय बापूसाहेब घाडगे या दोन ठेकेदारांवर गुन्हा दाखल केला.
अधिकची माहिती अशी, मे २०२६ या कालावधीत लघुपाटबंधारे अंतर्गत जिल्ह्यात पाझर तलावांची विविध कामे करायची होती. यासाठी निविदा प्रक्रिया राबवली. संबंधित दोन्ही ठेकेदारांनी वेगवेगळ्या कामांसाठी कमी निविदा सादर केल्याने त्यांना काम मंजूर झाले. कामाच्या मंजुरीबाबत शासकीय प्रक्रिया झाल्यानंतर सुरक्षा ठेवसह इतर शासकीय प्रक्रिया म्हणून दोन्ही ठेकेदारांनी अनामत रक्कम भरून त्याचे चलन झेडपीला जमा करावे लागते. दोन्ही ठेकेदारांनी ही प्रक्रिया पार पाडली. ठेकेदारांकडून आलेल्या चलनाबाबत खातरजमा करण्यात आली. मात्र, संबंधित चलन बोगस असल्याचे समोर आले. यामुळे जिल्हा परिषदेची २८ लाख ५० हजार ९५० रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.