

शशिकांत शिंदे
सांगली : मुंबईत पाच दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने मंगळवारी मराठा आरक्षणासंदर्भात विविध घोषणा केल्या. त्यात सातारा व औंध गॅझेटचा अभ्यास करून सवलती देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे लाखो मराठा बांधवांना या सवलतींचा लाभ मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. विशेषतः पूर्वी सातारा जिल्ह्याचा भाग असलेल्या वाळवा, शिराळा, तासगाव, पलूस, कडेगाव, खानापूर आणि औंध संस्थानचा भाग असलेल्या आटपाडी तालुक्यातील मराठा समाजबांधवांना लाभ मिळणार आहे.
आंदोलनामुळे कुणबी नोंद असलेल्या मराठा समाजाला सवलती देण्याबाबत घोषणा झाली. मात्र, अनेक मराठा समाजबांधवांकडे कुणबी असल्याच्या नोंदी नाहीत. सातारा आणि औंध गॅझेटनुसार या भागातील मराठा आणि कुणबी एकच आहेत. त्यांच्या चालीरीती आणि व्यवहार एकच असल्याच्या नोंदी आहेत.
1881 च्या जनगणनेनुसार सातारा जिल्ह्यात कुणबी बांधवांची लोकसंख्या 5 लाख 83 हजार 569 होती. ते जिल्ह्यात सर्वत्र आढळतात. ते कुणबी कश्यप ऋषीला आपल्या जातीचा मूळ पुरुष मानतात. ते या जिल्ह्यात मारवाड, जोधपूर आणि उदयपूर भागातून आलेले आहेत. ते शहाण्णव कुळी असून चव्हाण, गायकवाड, जाधव, शिंदे आणि शिर्के इत्यादी आहेत. पुरुषांची नावे साधारणतः गोविंद, परसू, रामा आणि शिदू, तर स्त्रियांची नावे साधारणतः भागिरथी, गंगा, गोजरा, रखमा आणि उमा अशी असतात.
येथील कुणबी काळसर, मध्यम बांध्याचे, काटक असून त्यांची मातृभाषा मराठी आहे. ते पशुपालन करतात. त्यांच्या घरात शेती अवजारे, धातू व मातीची भांडी, कट्टा, जाते, मुसळ इत्यादी वस्तू प्रामुख्याने आढळतात.
या लोकांच्या आहारात ज्वारी, बाजरी, कडधान्ये, भाजीपाला, फळफळावळ, कंद, मिरच्या, मसाले, तेल, लोणी, मासे, अंडी, कोंबडीची व बकर्याची सागुती, शिवाय रानटी डुक्कर, ससे, हरणाचे मांस यांचा समावेश असे. शेतात काम करताना घोंगडी वापरतात. महिला साडी, चोळी, कपाळावर कुंकू, क्वचितप्रसंगी केसांमध्ये फुले माळतात. त्या कष्टाळू, मितभाषी, अतिथ्यशील व प्रामाणिक असतात. कुणबी प्रामुख्याने शेतकरी असल्यामुळे स्त्रिया व मुले शेतीकामात मदत करतात. हिंदूंच्या सर्व देव-देवतांची पूजाअर्चा, सण-उत्सव व नेहमीचे उपासतापास करतात. गोसाव्यास धर्मगुरू मानून त्याच्याकडून उपदेश घेतात.
स्त्रिया प्रथम प्रसूतीसाठी माहेरी जातात. बाळंतपणानंतर सुईण व सुवासिनीची ओटी भरून त्यांना हळद-कुंकू भेट देतात. सुखवस्तू कुटुंबात मुलाचा जन्म झाल्यास दुसर्या दिवशी शेजारी, नातेवाईक व मित्रपरिवारातील स्त्रिया घराजवळील रस्त्यावर पाणी ओततात. त्या महिलांना बाराव्या दिवशी मेजवानी आणि चोळ-खण भेट देतात, यासारख्या प्रथा-परंपरांच्या अनेक नोंदी आहेत.
सातारा गॅझेटनुसार मराठा आणि कुणबी एकच असल्याची नोंद आहे. त्यामुळे वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव, कडेगाव, खानापूर तालुक्यांतील, तर औंध संस्थानमध्ये असलेल्या आटपाडी तालुक्यास लाभ होणार आहे.
सांगली जिल्ह्यात मोठ्या संख्येने मराठा समाज आहे. मात्र, यातील अनेक मराठा समाजबांधवांकडे कुणबी नोंदी नाहीत. सातारा आणि औंध गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी एकच असल्याबाबत नोंद आहे. त्यांचे रीतीरिवाज, परंपरा, चाली एकच आहेत. आता सरकारने केलेल्या या घोषणेमुळे मराठा समाजबांधवांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.
अॅड. बाबासाहेब मुळीक, सामाजिक विषयांचे अभ्यासक, विटा.