

तासगाव शहर : शाळेसमोर गतिरोधक करा, वाहने वेगात जात असल्याने लहान मुलांचा जीव धोक्यात असतो, अशी मागणी करून देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले. याचा निषेध म्हणून चक्क तुरची (ता. तासगाव) चे सरपंच विकास डावरे हे शाळेच्या समोरील रस्त्यावर झोपले. मी झोपलो नाही, तर तासगाव तालुक्याच प्रशासन झोपल आहे, असा आरोप करत त्यांनी नागरिकांचे लक्ष वेधले.
तुरची जिल्हा परिषद शाळा जिल्हा मार्गशेजारी आहे. रस्त्यावरून वेगात वाहने जात असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत येताना व शाळेतून घरी जाताना अपघाताचा धोका असतो. 4 दिवसांपूर्वी दोन विद्यार्थ्यांचा गंभीर अपघात होण्यापासून थोडक्यात बचावले. दरम्यान गावचे सरपंच विकास डावरे यांनी सहा महिन्यापूर्वी बांधकाम विभागाला रस्त्याच्या दोन्ही बाजूस गतिरोधक करण्याची मागणी केली होती. मात्र बांधकाम विभागाने या मागणीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले असल्याचा आरोप डावरे यांनी केला. डावरे यांनी सोमवारी शाळेच्या समोर झोपून निषेध व्यक्त केला. याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला. ते म्हणाले, विद्यार्थ्यांच्या जिवावर प्रशासन उठले आहे. एक सरपंच म्हणून केलेली मागणी देखील दुर्लक्षित केली जाते. यामुळे तासगाव तालुक्याच प्रशासन झोपले आहे.