

तासगाव : विकास आघाडीच्या माध्यमातून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लढण्याची घोषणा माजी खासदार संजय पाटील यांनी केली आहे. याचबरोबर आता शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरुन निकराची लढाई करणार आहेत.
मंगळवार (दि.१४) रोजी चक्काजाम आंदोलन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. याबाबतचे निवेदन तासगावचे तहसीलदार अतुल पाटोळे यांना देण्यात आले आहे. माजी खासदार संजय पाटील यांनी गुरुवारी तहसीलदार अतुल पाटोळे, तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे, यांच्यासह अधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा केली.
निवेदनात म्हटले आहे, सांगली जिल्ह्याच्या तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे शेती पिकांचे मोठे व अभूतपूर्व नुकसान झाले. द्राक्षे, ऊस, सोयाबीन, उडीद, भुईमुग, मका, हुलगा, भाजीपाला व इतर फळपिके यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेले पीक पूर्णपणे वाया गेले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. नुकसानग्रस्त शेतीचे सरसकट पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत मिळावी. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी.
गेल्या काही वर्षांपासून अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहेत. आता कर्जे काढून शेती करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांचे यंदाच्या प्रचंड नुकसानीमुळे आर्थिक कंबरडे मोडले आहे. या गंभीर परिस्थितीत नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याची गती अत्यंत संथ आहे. त्यामुळे पंचनाम्यांची संख्या अत्यल्प असून मोठ्या प्रमाणात शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची भीती आहे.
यावेळी माणिक जाधव, सुखदेव पाटील, बाबासाहेब पाटील, सुनिल जाधव, हणमंत पाटील, महेश पाटील, अविनाश पाटील, संदीप पाटील, शशिकांत जमदाडे, दिग्विजय पाटील, आर. डी. पाटील, जाफर मुजावर, अमित पवार, करण पवार, तुषार हुलवाने यांसह कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते.
युवा नेते प्रभाकर पाटील यांनी आंदोलनासंदर्भात तासगावचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांची भेट घेऊन निवेदन दिले. मागण्या पूर्ण न झाल्यास १४ ऑक्टोबर रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी त्यांनी सविस्तर चर्चा करुन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.