Sangli Politics: पहिले वर्ष अध्यक्ष पद द्या, सोबत येऊ

संजय पाटील यांचा आ. जयंत पाटील, आ. विश्वजित कदम यांच्याकडे प्रस्ताव
Sangli ZP
Sangli ZPPudhari
Published on
Updated on

सांगली : शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष एकत्र आहेत. पहिले एक वर्ष अध्यक्षपद राष्ट्रवादीला द्या, आम्ही सोबत येऊ, असा प्रस्ताव माजी खासदार संजय पाटील यांनी आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजित कदम यांच्याकडे दिल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्तास्थापनेचा तिढा अधिकच रंगतदार होत आहे.

महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये खलबते सुरू आहेत. चर्चासत्रे आणि गुप्त बैठकांचा धडाका जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांची रविवारी आणि भाजपची सोमवारी बैठक होणार आहे. जिल्हा परिषदेच्या निकालात कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नाही. सर्वाधिक 18 जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मिळाल्या आहेत. भाजपला 16, काँग्रेसला 11, शिवसेनेला 7 आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला 6 जागा मिळाल्या आहेत, तर रयत क्रांती, जनसुराज्य शक्ती आणि शिवसेना (उबाठा) पक्षाला प्रत्येकी 1 जागा मिळाली आहे. त्यामुळे सत्तेचे त्रांगडे निर्माण झाले आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात सत्तेची समीकरणे जुळविण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. गुरुवारी रात्री महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला आमदार जयंत पाटील, आमदार डॉ. विश्वजित कदम, खा. संजय पाटील उपस्थित होते. सत्तास्थापनेसाठी किमान समान कार्यक्रम, अध्यक्ष-उपाध्यक्ष पदांची वाटणी, तसेच कोणत्या पक्षाचा पाठिंबा कसा मिळवायचा, यावर सविस्तर खलबते झाल्याची माहिती मिळाली. यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष एकत्रित आहेत. पहिले एक वर्ष अध्यक्षपद राष्ट्रवादीला द्या, आम्ही सोबत येऊ, असा प्रस्ताव माजी खासदार संजय पाटील यांनी या बैठकीत दिल्याची माहिती आहे.

रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या चर्चेमुळे जिल्हा परिषदेच्या राजकारणात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी पुन्हा मुंबईत एकत्र बसण्याचे ठरले आहे. या बैठकीला खासदार विशाल पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजित कदम उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील बैठकीत सत्तेचा प्रस्ताव कसा ठेवायचा?, कोणत्या पक्षांना सोबत घ्यायचे?, याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील काही प्रमुख नेत्यांसोबत बैठक होणार असल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी संभाव्य नावेही यावेळी चर्चेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आघाडी करण्याच्या प्रयत्नात आहे,

तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील काहींची भाजपशी जवळीक वाढताना दिसत आहे. असे असले तरी, एक मोठा गट आघाडीसोबत जाण्यास अनुकूल असल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषदेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्याने ‌‘कोण कुणासोबत?‌’ हा प्रश्न कार्यकर्त्यांसह मतदारांनाही पडला आहे. सर्वच पक्षांतील सदस्यांना सत्तासमीकरणात मोठे महत्त्व आले आहे. त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

निशिकांत पाटील, पालकमंत्री यांची बैठक

जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेचा तिढा कायम असताना राजकीय पटावर वेगळ्याच हालचाली सुरू आहेत. राष्ट्रवादीने (अजित पवार) अध्यक्ष पदाचा प्रस्ताव प्रदेशाध्यक्षांकडे पाठविला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची शुक्रवारी भेट झाली. या भेटीवेळी सत्तेसाठी प्राथमिक बोलणी झाल्याची माहिती समोर येत आहे. सत्तास्थापनेत अध्यक्षपद दिल्यास आम्ही पाठिंबा देऊ, अशी भूमिका निशिकांत पाटील यांनी मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली. या चर्चेचा पुढचा टप्पा म्हणून पालकमंत्री सोमवारी त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील नेत्यांसोबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news