Sangli Politics: संजय पाटील यांचा त्रागा... मध्यरात्रीच सदस्यांना आणले परत!

अध्यक्ष निवडीआधी ईश्वरपुरात घडल्या नाट्यमय घडामोडी : राष्ट्रवादीच्या नेत्यांत वादावादी
Sanjay Patil
Sanjay Patil Pudhari
Published on
Updated on

ईश्वरपूर : जिल्हा परिषदेत कोणाच्या बाजूने जायचे, यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटात मतभेद उफाळून आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मंगळवारी दिवसभर ईश्वरपुरात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. दिवसभर बैठकांचे सत्र सुरू होते. राष्ट्रवादीचे नेते माजी खासदार संजय पाटील व राष्ट्रवादी पक्षाच्या अन्य नेत्यांत जोरदार वादावादी झाल्याचीही चर्चा आहे. पक्षात मतभेद उफाळून आल्याने मध्यरात्रीच संजय पाटील आपल्या सदस्यांना घेऊन कराडवरून परत आले.

जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या आदल्या दिवशी दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या नेत्यांची दुपारपासून येथे बैठक सुरू होती. या बैठकीआधीपासूनच महाविकास आघाडी, की महायुतीच्या बाजूने जायचे, यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांत वादावादी झाली होती, असे सांगण्यात येते. जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील व माजी खासदार संजय पाटील यांचा कल भाजपच्या बाजूने जाण्याकडे होता, तर माजी आमदार अजितराव घोरपडे, राजेंद्र देशमुख, शिवाजीराव नाईक व विलासराव जगताप यांच्यात मात्र आपण भाजपच्या विरोधात निवडणूक लढलो आहोत आणि त्यांनाच पाठिंबा का द्यायचा? असा मतप्रवाह होता. यामुळे पक्षात दोन गट पडले होते. मंगळवारी दुपारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आ. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ईश्वरपूर येथे दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली.

माजी खासदार संजय पाटील यांच्यासह दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित होते. या बैठकीतही अध्यक्ष पदावर एकमत होत नव्हते. संजय पाटील हेही काहीसे अस्वस्थ होते. त्यांचे त्यांच्याच पक्षातील नेत्यांशी खटके उडत होते. रात्री साडेआठ वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती. संजय पाटील रागारागाने बैठकीतून निघून गेले. त्यानंतर अन्य नेते कराड येथे हॉटेलमध्ये थांबलेल्या जिल्हा परिषद सदस्यांना भेटण्यासाठी गेले. त्यानंतर रात्री एक-दीड वाजता संजय पाटीलही कराड येथे गेले. ते आपल्या दोन सदस्यांना घेऊन परत आले. बुधवारी या दोन सदस्यांनी भाजपच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटात फूट पडल्याचे स्पष्ट झाले. तसेच या नाट्यमय घडामोडीचेच पडसाद जणू काल जिल्हा परिषद अध्यक्ष - उपाध्यक्ष निवडणुकीच्या मतांवर झाल्याचे दिसले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news