

सांगली : सिद्धेवाडी मध्यम प्रकल्पाच्या डावा-उजवा कालव्याच्या कामाबाबत मी खासदार असताना 2023 मध्येच पाठपुरावा करुन गती घेतली आहे. आमदारांनी जुन्या कामाचे श्रेय घेवून पाण्याचे राजकारण करण्याची गरज नाही. शेतकरी कोलमडून पडला आहे. राजकीय संघर्ष थांबवून शेतकरी उभा करण्याची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकत्र येवून लढू, अशी साद माजी खा. संजय पाटील यांनी आ. रोहित पाटील यांना शनिवारी पत्रकार परिषदेत घातली.
माजी खा. पाटील म्हणाले, सिद्धेवाडी मध्यम प्रकल्पााच डावा-उजवा कालव्याच्या कामाबाबत मी खासदार असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 2023 मध्ये पाठपुरावा केला होता. त्यानंतर कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी वस्तुस्थितीबाबतचा अहवाल प्रस्तावासह दाखल केला होता. जलसंपदा विभागाकडून सिद्धेवाडी प्रकल्पाच्या डावा व उजवा कालवा विशेष दुरुस्ती कामासाठी 24.62 कोटी रुपयांच्या कामांसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. कालव्याच्या कामांबाबत मी यापूर्वीच पाठपुरावा करुन मंजूर केला आहे. त्यामुळे आमदार सिद्धेवाडी कालव्याच्या कामांचे श्रेय घेत आहेत. दुसऱ्या केलेल्या कामाचे श्रेय घेवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे योग्य नाही.
सद्यस्थिती तालुक्यातील शेतकरी कोलमडून पडला आहे. द्राक्ष, डाळिंबाच्या बागा तोडून टाकत आहेत. श्रेयवाद आणि इर्षेचा वाद घालून कुणाची तरी जिरवायच्या नादात राजकारण करु नये. तुम्ही खरंच काय आणलं, आपण खोटं काय-काय सांगता, हे सांगण्याची ही वेळ नाही. लोकांकडून ही संघर्ष करण्याची वेळ नाही. मतभेद थांबवून प्रश्न सोडवू, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. या कारणांनी सद्यस्थितीत शेतकऱ्यांना उभे करण्याची गरज आहे. त्यामुळे आमदारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकत्र यावे.