Sangola Accident : सांगोल्याजवळ अपघातात शेणेतील माय-लेकाचा मृत्‍यू

हैदराबादहून परतताना जेसीबीची मोटारीस धडक
Sangola Accident News
सांगोल्याजवळ अपघातात शेणेतील माय-लेकाचा मृत्‍यू
Published on
Updated on

कासेगाव : हैदराबादहून आपल्या मूळ गावी परतत असताना आंधळगाव (ता. सांगोला) येथे राष्ट्रीय महामार्गावर मोटार आणि जेसीबीच्या अपघातात शेणे (ता. वाळवा) येथील आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात कुटुंबातील अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. सूरज अशोक पाटील (वय ३३) व शारदा अशोक पाटील (वय ६०) अशी मृत माय-लेकाची नावे आहेत. ही घटना सोमवार, दि. ८ रोजी सायंकाळी ६ वाजता मंगळवेढा ते सांगोला रस्त्यावर घडली. या घटनेमुळे शेणे परिसरावर शोककळा पसरली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, शेणे येथील रहिवासी असलेले सूरज पाटील हे व्यवसायाने इलेक्ट्रिकल इंजिनिअर व शासकीय कंत्राटदार होते. त्यांचे भाऊ विशाल पाटील हे हैदराबाद येथे नोकरीस आहेत. त्यांना भेटण्यासाठी सूरज पाटील, त्यांचे वडील अशोक पाटील, आई शारदा, पत्नी नीता आणि पुतण्या आयुष असे पाच जण मोटारीतून (क्र. एमएच ५० एमयू ५१२१) हैदराबादला गेले होते.

सोमवारी हे सर्व जण हैदराबादहून गावी परतत होते. सूरज मोटार चालवत होते, तर वडील अशोक पाटील त्यांच्या शेजारील सीटवर बसले होते. आई शारदा, पत्नी नीता व पुतण्या आयुष हे मागील सीटवर बसले होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मंगळवेढा-सांगोला दरम्यान आंधळगाव हद्दीत त्यांच्या मोटारीची जेसीबीशी धडक झाली.

अपघातात सूरज आणि त्यांची आई शारदा यांचा मृत्यू झाला. तर त्यांचे वडील, पत्नी आणि पुतण्या हे तिघे जखमी झाले. या अपघाताची नोंद सांगोला व मंगळवेढा पोलिस ठाण्यात झाली आहे. मृत सूरज आणि शारदा पाटील यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी शेणे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news