Sangli Murder : सांगलीवाडीत हॉटेलमधील वादातून तरुणाचा खून

दोन पोलिस कर्मचाऱ्यासह तिघांवर गुन्हा दाखल
Sangli Murder : सांगलीवाडीत हॉटेलमधील वादातून तरुणाचा खून
Published on: 
Updated on: 

​सांगली : सांगली-आष्टा रस्त्यावर सांगलीवाडी येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या तरुणाचा हॉटेल मालकासाेबतच्या तक्रारीतून झालेल्या बेदम मारहाणीत मृत्यू झाला. याप्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील दोन कर्मचाऱ्यासह तिघांविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय वसंत पाटील (वय ३६, रा. अमर चौक, धनगर गल्ली, सांगलीवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

​याबाबत मृताचा भाऊ विशाल वसंत पाटील (वय ३०, रा. अमर चौक, धनगर गल्ली, सांगलीवाडी) यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुशील भीमराव सरगर आणि सुमित भीमराव सरगर (मूळ रा. अभयनगर, सध्या नवी मुंबई पोलिस दलातील कर्मचारी) आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तिघेही हल्लेखोर फरार आहेत.

पोलिसांना देण्यात आलेल्या फिर्यादीतील माहितीनुसार, विजय पाटील हे शेती व्यवसाय करत होते. मंगळवार, दि. ९ नोव्हेंबररोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास विजय पाटील आणि त्यांचा मित्र विशाल काटकर हे सांगली-आष्टा रोडवरील ‘हॉटेल अनुयश’ येथे जेवणासाठी गेले होते. तेथे विजय पाटील आणि हॉटेल मालक, माजी नगरसेवक हरिदास पाटील यांच्यात काही कारणावरून वाद झाला. या वादानंतर मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मृत विशाल यांचे भाऊ, फिर्यादी विशाल पाटील हे आपले मित्र प्रकाश भानुसे आणि पवन कोळी यांच्यासह जेवणासाठी हॉटेल अनुयश येथे पोहोचले. ​त्यावेळी हॉटेलमध्ये विजय आणि हॉटेल मालक हरिदास पाटील यांच्यात शाब्दिक चकमक आणि शिवीगाळ सुरू असल्याचे त्यांना दिसले.

विशाल आणि त्यांचे मित्र वाद सोडवण्यासाठी पुढे गेले असता, हॉटेल मालकाच्या बाजूने आलेले पोलिस कर्मचारी सुशील सरगर व सुमित सरगर आणि त्यांच्यासोबतच्या एका अनोळखी व्यक्तीने विजय यांना पकडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

भांडण सोडवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच हल्लेखोरांनी विजय यांना हॉटेलच्या भिंतीवर आणि लोखंडी शटरवर जोरात आपटले. या गंभीर मारहाणीत विजय बेशुद्ध होऊन खाली कोसळले. यावेळी विजय यांना वाचवण्यासाठी त्यांचा मित्र प्रकाश भानुसे यांनी हॉटेलमधील पाण्याचा जग हल्लेखोरांच्या दिशेने फेकून मारला. विजय बेशुद्ध पडल्याचे पाहून तिन्ही हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. बेशुध्दावस्थेत विजय यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सांगली शहर पोलिस ठाण्याकडील उपनिरीक्षक रेश्मा खोत यांनी फिर्याद नोंदवून घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.

पोलिस असल्याचे ओळखपत्र

फिर्यादीत विशाल पाटील यांनी म्हटले आहे की, ​हल्ला करणाऱ्यांपैकी एकाने आपले नाव राम सरगर असून आपण नवी मुंबई पोलिस दलात नोकरीस असल्याचे सांगत ओळखपत्र दाखवले, तर दुसऱ्याने आपले नाव लखन सरगर असल्याचे सांगितले.

​रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू

घटनेनंतर विजय यांचे मित्र प्रकाश भानुसे यांनी तातडीने १०८ क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलावली. बेशुद्ध अवस्थेतील विजय यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

हल्लेखोर जुळे भाऊ; वाढदिवसाच्या पार्टीसाठी हॉटेलमध्ये

हल्लेखोर सुशील आणि सुमित हे दोघे जुळे भाऊ आहेत. त्यांचा मंगळवारी वाढदिवस होता. त्यानिमित्ताने पार्टी करण्यासाठी ते हॉटेलमध्ये आले होते. त्यावेळी झालेल्या वादात त्यांनी भाग घेतला. त्यातून झालेल्या माराणीत विजय पाटील यांचा मृत्यू झाला.

फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळाची पाहणी

घटनेनंतर तिन्ही संशयित अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सकाळी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. फॉरेन्सिक व्हॅन व तज्ज्ञांच्या पथकाने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे मिळवले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.