

सांगली : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत 'माझी शाळा आदर्श शाळा' अंतर्गत मॉडेल स्कूल हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमामुळे अनेक शाळांचे रूप पालटले आहे. या उपक्रमाची राज्यभर चर्चा सुरू आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनाही उपक्रमाची भुरळ पडली. शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्याकडून मंत्री भुसे यांनी याबाबत माहिती घेतली. तसेच हा उपक्रम राज्यभर राबवण्यात येणार असल्याचे संकेत मिळाल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.
मंत्री भुसे यांनी मालेगाव तालुक्यातील अनेक शाळांना भेटी दिल्या. विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती यांच्याशी संवाद साधला. सर्वसामान्य, गोरगरीब, बहुजनांच्या मुलांसाठी सुरू केलेले शैक्षणिक उपक्रम पुढे नेऊन एक पॅटर्न तयार करावा. राज्याला आदर्श अशा शाळा निर्माण होतील, असा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे. शिक्षणमंत्री भुसे यांनी जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी सांगलीच्या मॉडेलस्कूलबाबत चर्चा केली.
त्यानंतर सांगली मॉडेल स्कूल पॅटर्न सादरीकरण करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी गायकवाड यांना केल्या होत्या. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली गायकवाड यांनी सांगलीच्या प्रकल्पाचे सादरीकरण केले. हॅपिनेस प्रोग्रॅमची पुस्तके, शैक्षणिक कॅलेंडर इत्यादी साहित्यासह समग्र शिक्षण अभियानासह इतर उपक्रमाबद्दल प्रभारी कार्यकारी अभियंता उमेश पाटील, विशेष शिक्षक राहुलराजे कुंभार आणि विषय तज्ज्ञ सुशांत माळी यांनी माहिती दिली.
राज्यभरातून यापूर्वी जे शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थ्यांसाठी चांगले प्रयोग राबविले आहेत, त्याची माहिती घेऊन गुणवत्तेचा पथदर्शक नवीन पॅटर्न तयार करून लवकरच तो राज्यासाठी कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे सांगलीचा मॉडेल स्कूल उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत, अशीही माहिती शिक्षणाधिकारी गायकवाड यांनी दिली.