

बागणी; पुढारी वृत्तसेवा : वाळवा तालुक्यातील बागणी येथील बागणी विकास सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी नागरिक संघटना पॅनेलने सर्वच्यासर्व जागा जिंकून आपली सत्ता कायम राखली. विजयानंतर समर्थकांनी एकच जल्लोष केला. विरोधी शेतकरी परिवर्तन पॅनेलचे बबन संपत पाटील यांच्या पॅनेलला एकही जागा मिळाली नाही.
या ठिकाणी तेरा संचालकांच्या जागांसाठी मंगळवारी मतदान झाले होते. सत्ताधारी नागरिक संघटना पॅनेलचे नेतृत्व ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव माळी, विलास माळी, माजी उपसरपंच सुभाष हवलदार, विद्यमान अध्यक्ष रमेश पाटील, डी. आर. पाटील, सिकंदर कराडकर आदींनी केले. विजयानंतर माळी म्हणाले, गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या काळातदेखील संचालक मंडळाने चांगली कामगिरी आहे. विविध उपक्रमांतून सभासदांना मदतीची हात आणि दिलासा देण्याचा प्रयत्न केला. याला सभासदांनी पाठबळ देत कामाची पावती दिली आहे. नागरिक संघटनेचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : आरिफ हशमुद्दीन चौगुले, दिलावर इनामदार, प्रशांत पाटील, सतीश पाटील, उमेश पाटील, रामचंद्र सुर्वे, दशरथ सावंत, कुलदीप शेटे, मुरलीधर बामणे, सुशीला भोई, वैशाली नगारे, लक्ष्मण कारंडे, कुमार माळी. सहायक सहकार उपनिबंधक रंजना बारहाते यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम केले. सहकार अधिकारी श्री. जाधव यांनी त्यांना सहाय्य केले.