S‌angli ZP: ‘माझी वसुंधरा‌’मध्ये जिल्हा परिषद सलग तिसऱ्यांदा राज्यात प्रथम

13 ग्रामपंचायतींचे विविध गटात यश; एकूण साडेदहा कोटींचे बक्षीस
S‌angli ZP
S‌angli ZP: ‘माझी वसुंधरा‌’मध्ये जिल्हा परिषद सलग तिसऱ्यांदा राज्यात प्रथमPudhari
Published on
Updated on

सांगली : पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या ‌‘माझी वसुंधरा अभियान 5.0‌’अंतर्गत सांगली जिल्हा परिषदेने सलग तिसऱ्यांदा राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतींनी विविध गटात यश मिळविले. एकूण बक्षिसाची रक्कम सुमारे 10 कोटी 75 लाख रुपये आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 2020 पासून राबविण्यात येणाऱ्या या अभियानात पर्यावरणपूरक उपक्रम, स्वच्छता, जलसंधारण, ऊर्जा बचत, वृक्षारोपण, कचरा व्यवस्थापन, जैवविविधता संवर्धन यासारख्या विविध घटकांवर आधारित गुणांकन केले जाते. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी मोठ्या प्रमाणावर लोकसहभागातून विविध उपक्रम राबविले. पर्यावरण संरक्षणाची प्रभावी चळवळ उभी केली आहे. त्यामुळे जिल्ह्याला राज्यस्तरावर विशेष पुरस्कार मिळाले आहेत.

1 हजार लोकसंख्या गटात पिंपळवाडीचा राज्यात द्वितीय क्रमांक आला आहे. 1 हजार ते दीड हजार लोकसंख्येत अलकूड (एम) ग्रामपंचायतीने विभागस्तरावर द्वितीय क्रमांक मिळविला. 2 ते 3 हजार लोकसंख्या गटात नांगोळे (ता. कवठेमहांकाळ) ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम, तर लंगरपेठने राज्यात तृतीय क्रमांक मिळविला. 3 ते 5 हजार लोकसंख्या गटात आळसंद (ता. खानापूर) ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम, तर वाळेखिंडी (ता. जत) ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळविला. याच गटात धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) ग्रामपंचातीला विभाग स्तरावर दुसरा क्रमांक मिळाला आहे.

5 ते 10 हजार लोकसंख्या गटात येडेनिपाणी (ता. वाळवा) ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. याच ग्रामपंचायतीला भूमी थिमेटिक प्रकारात राज्यस्तरावर पहिला, तर मिरज तालुक्यातील सलगरे ग्रामपंचायतीने विभाग स्तरावर दुसरा क्रमांक पटकाविला. 10 हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या गटामध्ये वाळवा तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायतीने राज्यात द्वितीय, तर कासेगावने तृतीय क्रमांक पटकाविला. विभाग स्तरात पेठ ग्रामपंचायतीला दुसरा क्रमांक मिळाला.

अभियानाच्या सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले. विशाल नरवाडे यांनीही मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर या अभियानाला गती दिली. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांना पुरस्कार प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली. राज्यस्तरीय कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती, मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांचा मुंबईत शनिवार दि. 21 रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याहस्ते सन्मान होणार आहे.

लोकसहभाग, नियोजन आणि पर्यावरणाबाबतची बांधिलकी, यामुळे सांगली जिल्हा परिषदेने सलग तिसऱ्यांदा राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे यामध्ये योगदान आहे.
- शशिकांत शिंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (ग्रामपंचायत) जि. प. सांगली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news