Chandrakant Patil : अध्यक्ष महायुतीचाच होणार; तीनपैकी एका पक्षाचा
सांगली : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होईल. भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष, शिवसेना या तीनपैकी एका पक्षाचा होईल. महायुती व्यतिरिक्त कोणाचाही होणार नाही, असा ठाम विश्वास भाजप नेते, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवनिर्वाचित जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या सत्कारप्रसंगी व्यक्त केला. तसेच नवीन पक्षांतरबंदी कायदा कडक आहे. एका दिवसात घरी जायचं आहे का, असे म्हणत त्यांनी सदस्यांना जणू थेट इशाराही दिला.
येथील खरे मंगल कार्यालयात भाजप, जनसुराज्य, रयत क्रांतीचे नवनिर्वाचित जिल्हापरिषद, पंचायत समिती सदस्यांचा सत्कार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते झाला. आमदार सुरेश खाडे, आमदार सत्यजित देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, पश्चिम महाराष्ट्र संघटक मकरंद देशपांडे, महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदूम, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरूड, सी. बी. पाटील, विलास काळेबाग, जतचे नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, आटपाडीचे नगराध्यक्ष यु. टी. जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मदेव पडळकर उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष आणि शिवसेना यांची बेरीज 31 होते, तर विरोधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) यांची बेरीज 30 होते. जिल्हा परिषदेत महायुतीचाच अध्यक्ष होईल. महायुती व्यतिरिक्त कोणाचाही अध्यक्ष होणार नाही. भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष, शिवसेना यापैकी एका पक्षाचा अध्यक्ष होईल.आताच महायुती ही महाविकास आघाडीपेक्षा 1 ने पुढे आहे. ते संख्याबळ टिकवायचे कसे, एकने पुढे आहे ते 10 ने कसे वाढवायचे, हे काम नेत्यांचे असते. ते काम नेते करतील. पण त्याचबरोबर हेही लक्षात ठेवा की नवीन पक्षांतर बंदी कायदा कडक आहे. ट्रॅफिकमध्ये अडकला अन् अध्यक्ष निवडीच्या बैठकीला आला नाही, तर तो सदस्य अपात्र होऊ शकतो. तेव्हा एका दिवसात घरी जायचे आहे काय?, असा जणू इशाराही पाटील यांनी दिला.
पराभवाचे विश्लेषण करा
चंद्रकांत पाटील म्हणाले, सांगली जिल्हा परिषदेत भाजपला कमी यश मिळाले, पण वाताहत झालेली नाही. जागा थोड्या कमी झाल्या, पण मतांचा टक्का वाढला आहे. जिल्हा परिषदेत भाजपला 16 जागा मिळाल्या. जनसुराज्यला 1 व रयत क्रांतीला 1 जागा मिळाली. भाजपचा 7 जागांवर थोडक्यात पराभव झाला. या जागा मिळाल्या असत्या तर संख्या 25 झाली असती. सत्तेजवळ गेलो असतो. जागा कमी का मिळाल्या, पराभव का झाला, मताधिक्य कमी का झाले, कुठे काय चुकले, कुठे कमी पडलो, याची चारपानी पुस्तिका काढा. पराभवाचे बूथनिहाय विश्लेषण करा. निवडून आलात; आता लोकांची कामे करा. पक्ष मजबूत करा. पक्षाचे विविध कार्यक्रम घ्या. लोकांच्या प्रश्नांवर प्रसंगी आंदोलनही करा. सदस्यांनी प्रशिक्षण घेतलेच पाहिजे. 2014 पासून भाजप हा पक्ष मागे गेला नाही. सतत पुढे जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. लोकांनी भल्याभल्यांना घरला पाठवले आहे. मात्र एकदाही देवेंद्र फडणवीस यांच्यावर अविश्वास दाखवलेला नाही. नेता एकच देवेंद्र फडणवीस, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

