Sangli ZP: सत्तास्थापनेचा तिढा कायम

निवड प्रक्रियेकडे लक्ष : ठोस निर्णयाविना चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच
Sangli ZP
Sangli ZPPudhari
Published on
Updated on

सांगली : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल लागून तब्बल बारा दिवस उलटले, तरीही अध्यक्ष व सभापती निवडीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. दुसऱ्या बाजूला सत्तास्थापनेचा तिढा अजूनही कायम आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये नेमकी सत्ता कधी स्थापन होणार, याबाबत नागरिकांसह सदस्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे.

जिल्हा परिषदेच्या निकालात महायुतीने बहुमताचा आकडा गाठला आहे, मात्र युतीमधील मित्रपक्षांच्या नेत्यांमध्ये युतीबाबत मत-मतांतरे आहेत. महाविकास आघाडीला एका सदस्याची गरज आहे. त्यांच्याकडून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष आणि शिंदे शिवसेनेच्या नेत्यांशी संपर्क साधला जात आहे, मात्र अजूनही तिढा सुटलेला नाही. युती, आघाडीच्या नेत्यांकडून गुप्त बैठका, चर्चासत्रे सुरू आहेत. अध्यक्ष पद आणि सभापती पदावरून दोन्ही बाजूंनी अटी-शर्ती मांडल्या जात आहेत. राजकीय नेत्यांकडून ‌‘लवकरच तोडगा निघेल‌’ अशी उत्तरे मिळत आहेत, पण प्रत्यक्षात मात्र कोणताही ठोस निर्णय होताना दिसत नाही. ‌‘कार्यक्रमाची घोषणा होऊदे, मग बघू‌’, अशी भूमिका नेत्यांकडून घेतली जात आहे.

जिल्हा परिषदेचा निकाल सोमवार, दि. 9 फेबु्रवारीरोजी लागला. मात्र बारा दिवसांनंतरही अध्यक्ष - सभापती निवडीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केलेली नाही. त्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. निवडून आलेल्या सदस्यांनाही आपल्या पक्षाच्या पुढील भूमिकेबाबत स्पष्टता नसल्याने, तेही संभ्रमावस्थेत आहेत.

दरम्यान, जिल्हा परिषदेत गेल्या चार वर्षांपासून प्रशासकराज आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून कारभार चालविला जात असल्याने अनेक विकासकामे रखडली असल्याच्या तक्रारी आहेत. स्थानिक प्रश्नांकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नाही, असा आरोप होत आहे. त्यामुळे नव्या पदाधिकाऱ्यांची निवड होऊन पदाधिकाऱ्यांमार्फत कारभार सुरू व्हावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. मात्र सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही आणि पदाधिकारी निवडीचा कार्यक्रमही घोषित नाही. यामुळे संभ्रम कायम आहे.

भाजप, राष्ट्रवादी अजित पवार, शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत नेत्यांची मुंबईत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. मात्र अंतिम निर्णय अजूनही झालेला नाही. त्यामुळे मुंबईतून आदेश काय येतो, याकडे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news