

सांगली : राज्य शासनाच्या पवित्र पोर्टलद्वारे निवड झालेल्या शिक्षकांच्या समुपदेशन प्रक्रियेला बुधवारी सांगली जिल्हा परिषदेत तब्बल पाच तास उशिरा सुरुवात झाली. सकाळी ११ वाजण्यापूर्वीच जिल्हा परिषद मुख्यालयात दाखल झालेल्या उमेदवारांना अखेर सायंकाळी साडेचारच्या सुमारास समुपदेशनासाठी आत बोलावण्यात आले. ही प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या प्रक्रियेत एकूण २८३ उमेदवारांचे समुपदेशन करून त्यांना शाळांची नियुक्ती देण्यात आली. मात्र विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्यांना अधिकृत नियुक्ती आदेश देण्यात आले नाहीत.
शासनाच्या पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांचे समुपदेशन करून त्यांना प्रत्यक्ष नियुक्ती देण्याचे नियोजन करण्यात आले होते. जिल्ह्यात ३०० हून अधिक शिक्षकांची नियुक्ती होणार असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यात २८३ उमेदवारांना बुधवारी समुपदेशनासाठी जिल्हा परिषदेत बोलावण्यात आले होते. सकाळी ११ वाजण्यापूर्वीच शेकडो उमेदवार जिल्हा परिषदेत दाखल झाले होते. अनेक उमेदवार आपल्या लहान मुलांसह व कुटुंबीयांसह आले होते. सांगली जिल्ह्यासह शेजारील जिल्हे व राज्यभरातून उमेदवार आल्यामुळे जिल्हा परिषदेत गर्दी होती.
त्यातच विधानपरिषद निवडणुकीची घोषणा झाल्याने जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली. या आचारसंहितेच्या काळात शिक्षकांच्या समुपदेशनाची ही प्रक्रिया घेता येईल की नाही, याबाबत काही कायदेशीर व तांत्रिक बाबींवर अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली. या प्रशासकीय संभ्रमामुळे प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू होण्यास मोठा विलंब झाला, असे स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले.
उमेदवारांना अखेर सायंकाळी साडेचारच्या सुमारास समुपदेशनासाठी सभागृहात बोलावण्यात आले. यामुळे दूरवरून आलेल्या उमेदवारांमध्ये व त्यांच्या नातेवाईकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण पसरले होते. विशेषतः परजिल्ह्यातून आलेल्या महिला व लहान मुलांची मोठी गैरसोय झाली. सायंकाळी उशिरा सुरू झालेली समुपदेशनाची प्रक्रिया रात्री सुमारे साडेअकरा वाजेपर्यंत अखंडपणे सुरू होती.
यावेळी उपस्थित सर्व २८३ उमेदवारांचे समुपदेशन पूर्ण करून त्यांना सेवा बजावण्यासाठी शाळांचे वाटप करण्यात आले. मात्र, आचारसंहितेचा अडसर असल्याने त्यांना नियुक्तीचे अधिकृत पत्र दिलेले नाही, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे निवड होऊनही शिक्षकांना प्रत्यक्ष नियुक्ती आदेशासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.