Sangli election : भाजप 32, तर राष्ट्रवादी (श. प.) ला 20 टक्के मते

पक्षफु टीनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादीला 12.50, तर शिवसेनेला 10.67 टक्के मते
Sangli Zilla Parishad
सांगली जिल्हा परिषद
Published on
Updated on

संजय खंबाळे

सांगली ः जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्वाधिक 18 जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सुमारे 2 लाख 57 हजार 793 मते मिळाली आहेत. हे प्रमाण एकूण मतदानाच्या 20.31 टक्के आहे, तर भाजपाला सुमारे 4 लाख 12 हजार 694 म्हणजेच 32.52 टक्के मते मिळाली आहेत.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 18 लाख 18 हजार 634 मतदार होते. त्यापैकी 69.76 टक्के मतदान झाले. 12 लाख 68 हजार 841 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा परिषदेच्या 61 जागांपैकी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सर्वाधिक 18 जागा मिळाल्या आहेत, भाजपाला 16, काँग्रेसला 11, शिवसेनेला 7, राष्ट्रवादीस 6 जागा मिळाल्या, तर शिवसेना (उबाठा), जनसुराज्य शक्ती आणि रयत क्रांती संघटनेला प्रत्येक 1 जागा मिळाली आहे.

2017 मध्ये भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. कधी भोपळाही फोडता न आलेल्या भाजपाने इतिहासात पहिल्यांदाच थेट शून्यावरून 25 जागांपर्यंत झेप घेतली होती. मित्रपक्षांना सोबत घेऊन भाजपाने मिनी मंत्रालयाची सत्ता काबीज केली होती. पाच वर्षे सत्ता अबाधित ठेवण्यास भाजपाला यश मिळाले. भाजपच्या नेत्यांनी गेल्या आठ-नऊ वर्षात जिल्ह्यात पक्षाची सर्वंकष बांधणी केली. विरोधी पक्षांतील अनेक दिग्गजांचा पक्षप्रवेक्ष घडवून आणला. राज्य, केंद्रातील सत्तेच्या माध्यमातून जिल्ह्यातील विकास कामांना कोट्यवधींचा निधी आणला. याच जोरावर जिल्हा परिषदेत एकहाती वर्चस्व घेण्यासाठी स्वबळाचा नारा दिला. जिल्हा परिषद गटात सर्वाधिक 50 आणि पंचायत समिती गणांमध्ये 104 उमेदवार उभे केले. मात्र जिल्हा परिषदेच्या 25 सदस्यसंख्येवरून त्यांची घसरगुंडी झाली. भाजपला केवळ 16 जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे भाजपावर आज आत्मचिंतनाची वेळ आली आहे. आताही निकालानंतर भाजपाच्या मित्रपक्षांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना साथ दिल्यास भाजपला सत्तेपासून लांब राहण्याची वेळ येऊ शकते.

2017 च्या निवडणुकीत भाजपाने स्वतंत्रपणे 39 गटात उमेदवार उभे केले होते. त्यापैकी 25 जागा जिंकण्यात त्यांना यश आले. त्यावेळी 3 लाख 31 हजार 16 म्हणजेच 30.42 टक्के मते मिळाली होती. यंदा भाजपने 50 उमेदवार उभे केले. त्यांच्या उमेदवारांना 4 लाख 12 हजार 694 मते मिळाली. ही टक्केवारी 32.52 अशी आहे. 11 जागा जादा लढवूनही मतांचा टक्का अवघा 2.1 ने वाढला आहे.

काँग्रेसच्या टक्केवारीत घसरण; आकड्यात आघाडी

जिल्हा परिषदेच्या 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसने जिल्हा परिषदेच्या 39 मतदारसंघात उमेदवार दिले होते, मात्र त्यांना अवघ्या 10 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला 2 लाख 50 हजार 936 म्हणजेच 21.97 टक्के मते मिळाली होती. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला 2 लाख 30 हजार 685 म्हणजेच 18.18 टक्के मते मिळाली आहेत. काँग्रेसची सदस्यसंख्या एकने वाढली असली तरी, मताचा टक्का 3.79 ने घसरला आहे. पलूस, कडेगाव तालुक्यात मात्र काँग्रेसने जोरदार मुसंडी घेतली आहे. सत्तास्थापनेसाठी काँग्रेसकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

गेल्यावेळच्या निवडणुकीत राष्ट्रवादी एकसंध होती. राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेच्या 15 जागांवर यश मिळाले होते, तर 2 लाख 73 हजार 403 म्हणजेच 23.93 टक्के मते मिळाली होती. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने जोरदार मुसंडी मारली. जिल्हा परिषदेच्या 61 जागांपैकी सर्वाधिक 18 जागांवर वर्चस्व मिळवले आहे. तसेच शरदचंद्र पवार पक्षाला 2 लाख 57 हजार 793 म्हणजेच 20.31 टक्के मते मिळाली आहेत. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने जोरदार कमबँक केले आहे. तसेच मिनी मंत्रालयावर महाविकास आघाडीचा झेंडा फडकविण्यासाठी त्यांच्याकडून जुळवाजुळव सुरू झाली आहे.

पक्षफुटीनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला 6 जागांवर यश मिळाले आहे. या पक्षाला 1 लाख 58 हजार 626 म्हणजेच 12.50 टक्के मते मिळाली. यंदाच्या निवडणुकीत शिंदे शिवसेनेने 32 ठिकाणी उमेदवार उभे केले होते. त्यापैकी 7 जागांवर भगवा फडकविण्यात शिवसेनेला यश आले आहे. शिवसेनेला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत 1 लाख 36 हजार 529 म्हणजेच 10.76 टक्के मिळाली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news