Sangli ZP Election : जिल्ह्यात चुरशीने 71 टक्के मतदान

पलूस तालुक्यात सर्वाधिक 75.69 टक्के ः तासगाव, आटपाडी तालुक्यांत वादावादी ः उद्या गुलाल
Sangli ZP Election
जिल्ह्यात चुरशीने 71 टक्के मतदान
Published on
Updated on

सांगली : जिल्हा परिषद व दहा पंचायत समित्यांसाठी शनिवारी मोठ्या चुरशीने 70 ते 71 टक्के मतदान झाले. सर्वाधिक 75.69 टक्के मतदान पलूस तालुक्यात झाले. सर्व तालुक्यांत मतदानासाठी सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत अनेक मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. किरकोळ अपवाद वगळता कोठेही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत पार पडले. जिल्हा परिषदेच्या 211, तर पंचायत समित्यांच्या 340, अशा एकूण 551 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. मतमोजणी सोमवार, दि. 9 रोजी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. निकालाची मोठी उत्सुकता लागून राहिली आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक नऊ वर्षांनंतर होत आहे. त्यामुळे सर्वच पक्षांतील नेत्यांनी, उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी जोमाने प्रचार केला होता. भाजप, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेनेसह आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे मतदान चुरशीने झाले. सकाळच्या टप्प्यात मतदानाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सकाळी नऊ वाजेपर्यंत अनेक गावांत मतदान केंद्रे ओस पडली होती. दहा वाजल्यानंतर मतदानास काहीसा वेग आला. कार्यकर्ते व उमेदवारांनी मतदारांना मोठ्या संख्येने बाहेर काढले. मतदारांना दुचाकी व चारचाकी वाहनांतून मतदानास घेऊन येण्यासाठी कार्यकर्ते धावपळ करीत हेोते. त्यामुळे दुपारनंतर मतदारांची रांग लागली होती. काही ठिकाणी कमालीची चुरस दिसत होती. त्यामुळे ईर्षेने मतदान झाले. दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला.

जिल्ह्यात सकाळी साडेसात ते साडेनऊ या पहिल्या दोन तासात अवघे 7.03 टक्के मतदान झाले होते. सकाळी बहुसंख्य केंद्रांवर मतदारांची गर्दी नव्हती. दहानंतर लोकांची गर्दी वाढू लागली. साडेअकरा वाजेपर्यंत 20.30 टक्के मतदान झाले होते. दुपारी दीडपर्यंत 36.01 टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 51.47 पर्यंत पोहोचली होती. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 60 ते 65 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला होता. मतदार रांगेत असल्याने काही ठिकाणी मतदान सायंकाळी सात वाजेपर्यंत चालले. रात्रीपर्यंत सुमारे 70 ते 71 टक्के मतदान झाले.

आटपाडीत वादावादी; तासगावमध्ये बाचाबाची

आटपाडी तालुक्यातील निंबवडे, झरे, बनपुरी, विभूतवाडीसह परिसरात भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ वादावादी झाली. तासगाव तालुक्यातील चिंचणी येथे दुपारी दोन गटात जोरदार बाचाबाची झाली. एकाला मारहाण करीत त्याचे कपडे फ ाडण्यात आले. मिरज तालुक्यातील हरिपूरमध्ये मतदानाच्या सुरुवातीलाच मतदान यंत्रामध्ये बिघाड झाला. त्यामुळे काही वेळ मतदारांना ताटकळत बसावे लागले. बेडगमध्येही मशीन बंद पडले. जत तालुक्यातील संख, डफळापूर येथेही मतदान यंत्र बंद पडले. पलूस तालुक्यातील बांबवडेतही मतदार यंत्रात बिघाड झाला.

लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीवेळी काही मतदान केंद्रांमध्ये मतदारांनी मतदानाचा व्हिडीओ करून सोशल मीडियावर व्हायरल केला होता. याची उलटसुलट चर्चाही झाली होती. प्रशासनाकडून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत खबरदारी घेण्यात आली होती. मोबाईल, स्मार्ट वॉचसारख्या गॅझेट्सला मतदान केंद्रांवर बंदी घालण्यात आली होती. मोबाईल बाहेर ठेवल्यानंतर मतदान केंद्रात प्रवेश दिला जात होता.जिल्ह्यातील 2 हजार 39 मतदान केंद्रांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी काही केंद्रांमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, तसेच मतदान केंद्रांच्या आवारातही काहीजण घुटमळत होते. त्यांना पोलिसांनी ‌‘प्रसाद‌’ दिला.

मिरज तालुक्यातील बुधगावमधील मतदारांचे मतदान बिसूरमधील मतदान केंद्रावर आले होते. केंद्र बदलले तर समजू शकतो, पण गावच बदलल्यामुळे मतदारांतून संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला.जिल्हा परिषदेच्या 2017 मधील निवडणुकीत 16 लाख 3 हजार 147 पैकी 11 लाख 42 हजार 102 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदान 71.88 टक्के झाले होते. गेल्या निवडणुकीत सर्वाधिक 80. 83 टक्के मतदान पलूस तालुक्यात झाले होते, तर सर्वात कमी 68.71 टक्के मतदान मिरज तालुक्यात झाले होते. यावेळची निवडणूक ऐतिहासिक ठरली. सर्वांनीच जोरदार प्रचार केल्याने मतदान 70 ते 71 टक्केपर्यंत गेले. मतदान विक्रमी झाले आहे. त्यामुळे आता कौल कुणाच्या बाजूने लागतो, याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news