Sangli ZP Elections: विक्रमी 2,035 उमेदवारी अर्ज दाखल

गटांत 746, गणांत 1289 अर्जांचा समावेश : इच्छुकांची झुंबड; अनेक ठिकाणी रात्रीपर्यंत उमेदवारांच्या रांगा
Sangli ZP Election
Sangli ZP ElectionPudhari
Published on
Updated on

सांगली : जिल्हा परिषदेच्या 61 गटांसाठी सुमारे 746, पंचायत समितींच्या 122 गणांसाठी सुमारे 1,289 असे एकूण सुमारे 2 हजार 35 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज भरण्यासाठी बुधवारी रात्रीपर्यंत इच्छुकांनी गर्दी केली होती. बहुसंख्य सर्वच पक्षांमध्ये बंडखोरीचे पेव फुटले आहे. त्यामुळे अपक्षांची गर्दी वाढली आहे. भाजप, शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, जनसुराज्य शक्ती, रयत क्रांती संघटनेकडून अर्ज भरण्यात आले आहेत. काही भागांत युती, तर काही ठिकाणी स्वबळावर मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. अर्ज मागे घेण्यास दि. 27 पर्यंत मुदत आहे. त्यानंतर लढतींचे चित्र समोर येणार आहे.

जिल्हा परिषदेची निवडणुकीची घोषणा मंगळवार, दि. 13 रोजी झाली. उमेदवारी अर्ज भरण्यास दि. 16 रोजी सुरुवात झाली. तालुकास्तरावर तहसील आणि इतर शासकीय कार्यालयांत अर्ज भरण्याची सुविधा करण्यात आली होती. बुधवार, दि. 21 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. पहिले तीन दिवस जिल्ह्यात गट आणि गणातून एकही अर्ज दाखल झाला नव्हता. दि. 19 रोजी 26 अर्ज आणि दि. 20 रोजी 407 उमेदवारी अर्ज दाखल झाले. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळपासूनच कार्यालयांमध्ये गर्दी सुरू झाली.

दुपारी अकरानंतर भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष, शिवसेना (उबाठा)चे उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी आले. त्याचबरोबर नाराज इच्छुकांनीही अपक्षांनीही अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. अर्ज भरण्यासाठी दुपारी 3 पर्यंत मुदत होती. अनेक ठिकाणी इच्छुकांची झुंबड उडाली होती. मुदतीमध्ये कार्यालयात दाखल झालेल्या उमेदवारांचे अर्ज भरून घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती. निवडणूक कार्यालयांच्या बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता. समर्थकांना कार्यालयाबाहेरच ताटकळत थांबावे लागले.

कोणत्याही पक्षाने बुधवारपर्यंत अधिकृत उमेदवारी यादी जाहीर न केल्याने अनेक ठिकाणी संभ्रमाचे वातावरण होते. पक्षांनी निश्चित केलेल्या उमेदवारांनाच अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे अनेक इच्छुकांनी आधी अर्ज दाखल करून नंतर एबी फॉर्मची प्रतीक्षा केली. सर्वंच पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. ज्यांना पक्षाकडून अर्ज दाखल करण्याचा निरोप मिळाला नव्हता, अशांपैकी अनेकजण अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक कार्यालयात उपस्थित होते.

कोणत्याही पक्षाकडून उमेदवारीबाबत अधिकृत घोषणा केली नव्हती. बुधवारी सकाळनंतर उमेदवारांना एबी फॉर्म वाटप सुरू केले. तालुकापातळीवर पक्षाच्या तालुकाध्यक्षांकडून एबी फॉर्म दिले. त्यानंतर संबंधित उमेदवारांनी आपल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात जाऊन एबी फॉर्म सादर केले. अपक्ष उमेदवारांमुळे राजकीय घडामोडीस अधिक वेग येणार आहे. राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसह ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news