Sangli Politics : भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याची रणनीती

आघाडीच्या नेत्यांच्या फॉर्म्युल्याची चर्चा ः भाजपकडूनही मित्रपक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणी सुरू
Sangli Zilla Parishad
सांगली जिल्हा परिषद
Published on
Updated on

सांगली ः जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेच्या हालचालींना आता वेग आला आहे. भाजपला सत्तेबाहेर ठेवत पर्यायी आघाडी उभी करण्यासाठी पडद्यामागे जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजप वगळून राष्ट्रवादी (शरद पवार पक्ष), राष्ट्रवादी (अजित पवार पक्ष), शिंदे-शिवसेना, काँग्रेस, शिवसेना (उबाठा) हे पाच पक्ष एकत्र येण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात प्रमुख नेत्यांची गुप्त बैठक झाल्याची चर्चा आहे. पुढील काही दिवसांत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. सर्वाधिक 18 जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मिळाल्या आहेत. तसेच भाजप 16, काँग्रेस 11, शिवसेना 7 आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला 6 जागा मिळाल्या. रयत क्रांती, जनसुराज्य आणि शिवसेना (उबाठा) पक्षाला प्रत्येकी 1 जागा मिळाली. त्यामुळे सत्तेचे त्रांगडे निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक जागा महत्त्वाची ठरत आहे.

सत्तास्थापनेसाठी 31 जागांची आवश्यकता आहे. महाविकास आघाडीकडे 30, तर महायुतीकडे 31 जागा आहेत. मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वतंत्र लढले होते. शिंदे शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये काही तालुक्यांत एकमेकांवर जोरदार टीकाटिपणी झाली, तसेच राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील काही नेत्यांचे भाजपमधील नेत्यांशी पटत नाही. याचाच फायदा आघाडीच्या नेत्यांनी घेतल्याची माहिती मिळाली.

गेल्या दोन-तीन दिवसात काही ठिकाणी प्रमुख नेत्यांची बैठकही झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत भाजपला दूर ठेवून पर्यायी सत्तासमीकरण कसे उभे करायचे, यावर सविस्तर चर्चा झाल्याचे बोलले जाते. प्रत्येक पक्षाने आपापले संख्याबळ मांडत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांसह विषय समिती सभापती पदाबाबत प्राथमिक तोडगा काढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. या संभाव्य आघाडीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात. विशेषतः राष्ट्रवादीचे दोन्ही गट आणि काँग्रेस एकत्र आल्यास मजबूत संख्या उभी राहते. त्यात शिवसेनेचा पाठिंबा मिळाल्यास सत्तास्थापनेला बळ मिळणार आहे. शिवसेनेचे नेते, पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांनी ‌‘सातारा पॅटर्न‌’ सांगलीत राबविण्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे. आमदार जयंत पाटील यांनीही पुण्यात पत्रकारांशी बोलताना तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे ‌‘भाजपविरोधी आघाडी‌’ हा पर्याय अधिक बळकट होताना दिसतो.

दरम्यान, भाजपकडूनही हालचाली थांबलेल्या नाहीत. सत्तास्थापनेसाठी महायुतीचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिंदे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर बोलणी सुरू आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज, सोमवारी जिल्ह्यात येणार आहे. सत्तास्थापनेबाबत ते सुरुवातीला प्रमुख पदाधिकाऱ्यांशी आणि त्यानंतर मित्रपक्षांशी चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. जिल्हा परिषदेत ‌‘कोणाची सत्ता येणार?‌’ यावर चर्चा रंगत आहेत. विकासकामे रखडू नयेत, स्थिर प्रशासन मिळावे, अशी अपेक्षा मतदार व्यक्त करत आहेत. त्यामुळे राजकीय तडजोडीपेक्षा स्थिर आणि सक्षम नेतृत्व मिळावे, अशी सर्वसामान्यांची भावना आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news