Sangli ZP Election : भाजपने प्रस्ताव मागवला; राष्ट्रवादीला हवे अध्यक्षपद

काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादीचीही आज बैठक; सत्तास्थापनेचा तिढा कायम
Sangli ZP Election
भाजपने प्रस्ताव मागवला; राष्ट्रवादीला हवे अध्यक्षपदPudhari Photo
Published on
Updated on

सांगली : जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसंदर्भात भाजपचे नेते, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडे प्रस्ताव मागवला. दरम्यान, काँग्रेस व दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज-गुरुवारी रात्री बैठक होणार आहे. त्यामुळे सत्तास्थापनेचा सस्पेन्स वाढला आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने अध्यक्षपदावर दावेदारी केली आहे. शिवसेनाही भाजपबरोबर जाण्यास आढे-वेढे घेत आहे. एकूणच या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघत आहे.

जिल्हा परिषदेत सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सर्वाधिक 18 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला 11 व शिवसेना (उबाठा) पक्षाला 1 जागा मिळाली आहे. हे तीन पक्ष एकत्र आल्यास संख्याबळ 30 होते. जिल्हा परिषदेत बहुमतासाठी 31 चा आकडा गाठावा लागणार आहे. भाजपला 16, शिवसेनेला 7, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला 6, जनसुराज्य शक्ती पक्षाला 1,तर रयत क्रांतीला 1 जागा मिळाली आहे. या पक्षांची बेरीज 31 होते. मात्र राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष तसेच शिवसेनेचे भाजपबरोबर सत्ता स्थापन करण्यास आढेवेढे सुरू आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी भाजपचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते माजी खासदार संजय पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. या दोन्ही नेत्यांची बैठक झाली.या बैठकीविषयी विचारले असता, माजी खासदार संजय पाटील म्हणाले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. आमच्या पक्षातील अन्य सर्व नेत्यांशी चर्चा करून प्रस्ताव देऊ, असे त्यांना सांगितले आहे. गुरुवारी रात्री राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील व काँग्रेसचे नेते डॉ. विश्वजित कदम यांच्याशी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या जिल्ह्यातील सर्व नेत्यांची बैठक होणार आहे. खासदार विशाल पाटील आज, गुरुवारी सांगलीत असतील तर तेही या बैठकीला असतील. बैठकीत काय होते ते पाहू, असेही चंद्रकांत पाटील यांना सांगितले आहे.

आमचा दावा अध्यक्षपदासाठी आहे. त्यादृष्टीने चाचपणी सुरू आहे. आमच्या पक्षाच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा होईल. जनमताचा कौल पाहून निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यांना त्याची माहिती दिली जाईल, असेही माजी खासदार संजय पाटील यांनी सांगितले. दरम्यान, भाजपचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत महायुतीचाच अध्यक्ष होईल, असा दावा केला आहे. मात्र विरोधकांच्याही हालचाली गतिमान झाल्या आहेत. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापना कोण करणार, याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे.

भाजप, काँग्रेस शिवसेनेच्या संपर्कात

भाजपचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे नेते आमदार सुहास बाबर यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आहे. बैठक घेऊया, असे ते म्हणाले आहेत. दरम्यान, खासदार विशाल पाटील तसेच काँग्रेसचे नेते आ. डॉ. विश्वजित कदम यांनीही आ. सुहास बाबर यांच्याशी फोनवरून संपर्क साधून चर्चा केली आहे. शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आ. जयंत पाटील यांनी शिवसेनेचे नेते तानाजी पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. माजी खासदार संजय पाटील आणि तानाजी पाटील यांच्याशीही चर्चा झाल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news