Sangli ZP Election: मिनी मंत्रालयासाठी आज मतदान

दिग्गज नेते, उमेदवारांची ‌‘मतपरीक्षा‌’ : क्रॉस व्होटिंगची शक्यता : सोमवारी मतमोजणी
Sangli ZP Election: मिनी मंत्रालयासाठी आज मतदान
Sangli ZP Election: मिनी मंत्रालयासाठी आज मतदानPudhari
Published on
Updated on

सांगली : जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आज, शनिवार, दि. 7 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान होणार आहे. जिल्हा परिषदेच्या 61 जागांसाठी 211, तर पंचायत समित्यांच्या 122 जागांसाठी 340 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. अनेक ठिकाणी काटा लढती होत आहेत. काही ठिकाणी क्राँस व्होटिंग होण्याची शक्यता आहे. ‌‘अर्थपूर्ण‌’ घडामोडी व फोडाफोडीला ऊत येण्याची शक्यता आहे. भाजपसाठी ही वर्चस्वाची, तर काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेनेसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.

जिल्हा प्रशासनाने मतदानाची जय्यत तयारी केली आहे. मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासन व पोलिस यंत्रणा सज्ज आहे. मतमोजणी सोमवार, 9 रोजी होणार आहे. निकालाची मोठी उत्सुकता जिल्ह्यात सर्वांना लागून राहिली आहे.गेले पंधरा ते वीस दिवस निवडणुकीचे मैदान चांगलेच तापले होते. उमेदवारीसाठी रस्सीखेच, प्रचारातील आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले.

एकाही पक्षाने सर्व गट-गणांत उमेदवार उभे केले नाहीत

निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी आघाडी-युती करणार असल्याचे वक्तव्य सातत्याने करण्यात येत होते. प्रत्यक्षात मात्र आघाडी-युती झालीच नाही. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीने स्वतंत्र उमेदवार उभे केले, तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसने मात्र समझोता करीत उमेदवार रिंगणात उतरवले. यंदाच्या निवडणुकीत महत्त्वाचे म्हणजे एकाही पक्षाला सर्वच 61 गटात आणि 122 गणांत उमेदवार उभे करता आलेले नाहीत.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी एकूण 18 लाख 18 हजार 742 मतदार आहेत. पुरुष मतदार 9 लाख 23 हजार 911, महिला मतदार 8 लाख 94 हजार 781, तर इतर 42 मतदार आहेत. एकूण 2 हजार 39 केंद्रांवर मतदान होणार आहेत. मतदान केद्रांवर 248 झोनल अधिकारी आणि 8 हजार 979 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुका पातळीवर शुक्रवारी मतदान केंद्राध्यक्षांकडे ईव्हीम मशीनसह इतर मतदानविषयक साहित्य सुपूर्द करण्यात आले. मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांच्या मतदान केंद्राकडे जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. सोबत पोलिस बंदोबस्त होता. पोलिस बंदोबस्तात मतदान साहित्य घेऊन मतदान अधिकारी, कर्मचारी दुपारी संबंधित मतदान केंद्रावर पोहोचले. सायंकाळपर्यंत आवश्यक तयारी पूर्ण झाली. आज, शनिवार, 7 रोजी मतदान आहे. सकाळी साडेसहाच्या सुमारास ‌‘मॉक पोल‌’ होईल. त्यानंतर सकाळी 7.30 वाजता प्रत्यक्ष मतदानास सुरुवात होईल. सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ आहे. मतदान जास्तीत जास्त होण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे.

जिल्हा परिषदेच्या 2017 मधील निवडणुकीत 16 लाख 3 हजार 147 पैकी 11 लाख 42 हजार 102 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदान 71.24 टक्के झाले होते. गेल्या निवडणुकीत सर्वाधिक 80.83 टक्के मतदान पलूस तालुक्यात झाले होते, तर सर्वात कमी 68.71 टक्के मतदान मिरज तालुक्यात झाले होते. यावेळी मतदानाचा टक्का वाढेल, असे चित्र दिसत आहे. मतमोजणी सोमवार, 9 फेब्रुवारीरोजी तालुकानिहाय मतमोजणी होणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या स्थापनेनंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे. त्यामुळे निकालाबाबत कमालीची उत्सुकता आहे.

मतदानाची टक्केवारी किती होणार, यावरही बरेच काही अवलंबून आहे. मतदान कमी झाले तर काय व जादा झाले तर कोणाच्या बाजूने निकाल लागेल, याची गणिते सध्या राजकीय वर्तुळात आखली जात आहेत. गावकट्ट्यावर केवळ कोण निवडून येणार, याचीच चर्चा रंगली आहे. काही ठिकाणी पैजाही लागल्या आहेत.

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदारांनी आपला हक्क बजावावा. निवडणुकीबाबत प्रशासनाकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांना पूर्ण प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे.
- अशोक काकडे, जिल्हाधिकारी, सांगली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news