

नंदू गुरव
सांगली : सकाळपासून राजकारण जोरात तापलं होतं. जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालयच. आपला माणूसच कारभारी झाला पायजे, या जिद्दीनं कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. बूथवरच चहा-नाष्टा चालू होता. घरातून ओवाळून घेऊन आलेले उमेदवार भल्या सकाळी मतदान केंद्राबाहेर हात जोडून उभे होते. नेते सहकुटुंब आपापल्या गावात जाऊन मतदान करून दौऱ्यावर बाहेर पडले होते. ऊन तापत चाललं होतं. नेते, कार्यकर्ते रस्त्यावर, पण मतदार घरात, अशी दुपारपर्यंत परिस्थिती होती. पण दुपारनंतर मतदार राजाचा मूड बदलला आणि थेंबे थेंबे तळे साचे, तसे टक्का टक्का मतदान वाढत गेले.
आधी घरकाम, मग मतदान...
गेला महिनाभर तापवलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या राजकारणाचा काल परीक्षेचा दिवस. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली खरी, पण रानात जाऊन गुराढोरांना वैरणपाणी करणं, धारा काढून दुधं घालणं, झालंच तर भाकरतुकडा करून पोरांना शाळेला पाठवणं... या कामाला आठ-नऊ वाजले आणि मग कुठं मतदारांना, आज मतदान असल्याची आठवण झाली. माधवनगरमध्ये तर शेती पण नाही आणि शेतकरी पण नाहीत. हे गाव पहिल्यापासून निवांत. सकाळी माधवनगरमध्ये मतदान आहे का नाही वाटावं, इतकी शांतता.
बुधगावकर उत्साहात
पुढं बुधगाव मात्र जागं होऊन मतदान करायला बाहेर पडलं होतं. जिल्हा परिषदेच्या तीन नंबर शाळेसमोर रांगा लागल्या होत्या. मतदार यादीत घोळ झालाय. एक जुनी आणि दुसरी अपडेट केलेल्या यादीचा मेळ बसंना झालाय. नावं विस्कटल्यात. मतदान स्लिप घरात आल्याच नायत. स्लिपा मिळाल्या, पण त्यावर बूथ नंबरच नाय. मंजे स्लिप मिळाली तरी ॲपवर जाऊन तपासायला लागतंच... माणसं रांगेत उभं राहून यंत्रणेवर राग काढत होती. बुधगावात 6 केंद्रांवर सकाळपासूनच समाधानकारक मतदान होत होतं. उमेदवार सैरभैर होऊन चकरा मारत होते. कसं काय वातावरण..? असं विचारत होते.
कवलापूरकर निवांत
सकाळचे अकरा वाजले होते. कवलापुरात पण म्हणावा तसा उत्साह जाणवत नव्हता. जिल्हा परिषदेच्या शाळा क्रमांक एकमध्ये मतदार येत होते जात होते. 84 वर्षांचे कृष्णा दत्तू भोसले, अंध विठ्ठल कांबळे यांनी जागरुकपणानं मतदान केलं. तालुका क्षेत्रीय अधिकारी अमरजित गायकवाड आणि टीम गणात फिरत होती. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत बामणोली गणात 18 टक्के, तर सावळीत 17 टक्के मतदान झाल्याचं त्यांनी सांगितलं.
दत्तनामासोबत मतदान
गुरुदेव दत्त... अशी गर्जना करत बिसूरकर दत्त यात्रेत अडकले असतानाच, हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं मतदान आलं. दत्त मंदिराजवळच मतदान केंद्र. दत्त दर्शनासोबत मतदानालाही गर्दी. दोन्हीकडं रांगा लागल्या होत्या. हिरवागार परिसर. सोबत दत्ताचं भजन. माणसं सुखा-समाधानात मतदान करत होती. मतदान करून राजाराम कोकाटेंच्या दत्त टी स्टॉलमधल्या भजी-भडंगावर ताव मारत होती. साडेअकरा वाजता खासदार विशाल पाटील पण दत्त दर्शनाला आले. दर्शन घेतलं, मतदानाची माहिती घेतली. कार्यकर्त्यांचा जोश पाहून दत्त पावल्याची भावना त्यांना झाली असेल. इंजिनिअर असलेली मधुरा विवेकानंद लुगडे पहिल्यांदाच मतदान करत होती. लोकं राजकारणावर नुसतं बोलतात, खरं तर त्यांना राजकारण शिकवायला पाहिजे. भ्रष्टाचार थांबला पायजे, असं तिनं ठासून सांगितलं.
खोतवाडी शांत शांत
दुपारी बारा वाजले होते आणि खोतवाडी शांत शांत होती. जिल्हा परिषदेच्या शाळेत सारी यंत्रणा सज्ज असली तरी, मतदार बाहेर पडले नव्हते. अगदी एक दोन गट येत होते, मतदान करून जात होते. पण त्यात उत्साह काही जाणवत नव्हता.
उत्सव... धार्मिक आणि लोकशाहीचा
दुपारचे साडेबारा वाजलेले, पण नांद्रेकरांना याचं भानही नव्हतं. सारा गाव पंचकल्याण सोहळ्यात अडकला आहे. साऱ्या जाती-धर्माचे लोक या सोहळ्यात योगदान देत आहेत. गावाला यात्रेचे स्वरूप आले आहे. एका बाजूला इतका प्रचंड मोठा सोहळा आणि दुसऱ्या बाजूला झेडपी, पंचायत समितीचं मतदान. एका बाजूला धार्मिक उत्सव आणि दुसऱ्या बाजूला लोकशाहीचा उत्सव. पंचकल्याण सोहळ्यातून मात्र मतदान करण्याबाबत वारंवार आवाहन केलं जात होतं. संयोजकांच्यावतीने मतदारांना याबाबत जाणीवपूर्वक माहिती दिली जात होती, असे डॉ. सचिन सकळे यांनी सांगितले. सकाळपासून वेळ मिळेल तसे नांद्रेकर मतदानाचा हक्क बजावत होते. उन्हाचा तडाखा जोरात जाणवत होता.
कर्नाळ... संथ, पण नियमित
कर्नाळ गावात शाळा नंबर एकमध्ये मतदान शांतपणानं सुरू होतं. मतदान संथ होतं, पण नियमित चालू होतं. लोक जागरुकपणे मतदानाला येत होते, मतदान करत होते. खासदार विशाल पाटील यांनीही मतदान केंद्राला भेट दिली. आडके यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली.