Sangli ZP Election : शक्तिप्रदर्शनाने जाहीर प्रचाराची सांगता

रॅली, सभा, पदयात्रेने वातावरण ढवळून निघाले ः उद्या मतदान, छुप्या प्रचाराला वेग
Sangli ZP Election
Sangli ZP ElectionPudhari
Published on
Updated on

सांगली : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची सांगता गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता झाली. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी गट आणि गणांत जोरदार शक्तिप्रदर्शन करत पदयात्रा काढल्या. घोषणाबाजी, फटाके, पारंपरिक वाद्यांच्या गजरात काही ठिकाणी रॅली काढण्यात आली. पदयात्रा व रॅलींमध्ये मोठ्या संख्येने गर्दी जमवण्यावर उमेदवार व कार्यकर्त्यांचा विशेष भर दिसून आला. उद्या, शनिवार, 7 फेबु्रवारी रोजी मतदान होणार आहे. आता छुप्या प्रचाराला वेग येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या 61 जागांसाठी 211 आणि पंचायत समित्यांच्या 122 गणांत 340 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (उबाठा), जनसुराज्य शक्ती, रयत क्रांती संघटनेकडून उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. काही ठिकाणी दुरंगी, तर काही ठिकाणी तिरंगी लढती रंगतदार ठरल्या आहेत. काही भागात अपक्ष उमेदवारही मैदानात आहेत. त्यामुळे निवडणुकीत रंगत आली आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी फेबु्रवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रचार शिगेला पोहोचला. अखेर गुरुवार, 5 फेबु्रवारीरोजी सायंकाळी 5.30 वाजता जाहीर प्रचाराची सांगता झाली. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सकाळपासूनच गावांमध्ये बॅनर, झेंडे, ढोल-ताशांचा गजर आणि घोषणांनी वातावरण दणाणून गेले होते. प्रमुख नेत्यांच्या सभांना चांगली गर्दी झाली. काही ठिकाणी तर शेवटच्याक्षणी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी घरभेटी, प्रचार फेऱ्या आणि मोटरसायकल रॅली काढत ‌‘घर टू घर‌’ प्रचारावर भर दिला. जिल्ह्यातील अनेक गट-गणांत हाय होल्टेज लढत आहे.

जाहीर प्रचार संपला असला तरी, छुपा प्रचार, राजकीय हालचालींना गती येणार आहे. मतदान शनिवारी, 7 फेबु्रवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत होणार आहे. मतमोजणी सोमवारी, 9 फेबु्रवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे. प्रचार थांबल्यानंतर आता ‌‘सायलेंट पिरियड‌’ सुरू झाला आहे. उमेदवारांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मतदान केंद्रांवर आवश्यक व्यवस्था पूर्ण करण्यात आली आहे. पोलिस बंदोबस्त, संवेदनशील गावांवर विशेष नजर आणि मतदान यंत्रांची तपासणी करण्यात आली आहे. निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून शांततेत आणि पारदर्शकपणे मतदान होण्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, प्रचार संपताच कार्यकर्त्यांनी विश्रांतीचा श्वास घेतला असला तरी, उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. गेल्या काही दिवसांत घाम गाळून केलेल्या प्रचाराचे फळ काय मिळणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गावपातळीवर चर्चा, आकडेमोड आणि अंदाजांना उधाण आले आहे. जाहीर प्रचाराचा पडदा पडला असला तरी, खरी लढत आता मतपेटीत होणार आहे. मतदारराजा कोणाच्या बाजूने कौल देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news