

कुपवाड : शहरातील प्रभाग 8 मधील वारणाली परिसरातील जिल्हा परिषद कॉलनीमध्ये नागरिकांच्या खासगी जागेमधून ड्रेनेज योजनेसाठी खोदाई करण्यात येत आहे. येथील रस्त्याचा वाद न्यायप्रवीष्ट असताना नागरिकांचा विरोध डावलून प्रशासनाने मनमानी करीत काम सुरू केल्याचा आरोप नागरिकांनी केला.
जिल्हा परिषद कॉलनीतील रस्त्याचा प्रश्न न्यायप्रवीष्ट आहे. काही दिवसांपूर्वी येथील मालमत्ताधारकांनी शासकीय मोजणी करून आपली हद्द निश्चित करून घेतली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी येथील मालमत्ताधारकांनी आपल्याच प्लॉटमधून 15 फूट रस्ता सोडला आहे. हाच रस्ता प्रमाण मानून महापालिकेने ड्रेनेज योजनेचे काम सुरू केले आहे. त्यास नागरिकांचा तीव्र विरोध आहे. महापालिकेने विभागीय आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे रस्ता करून द्यावा, अशी मागणी वारंवार प्रशासनाकडे केली आहे.
यासंदर्भात प्रशासन दाद देत नसल्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सध्या ही बाब न्यायप्रवीष्ट आहे. असे असतानाही महापालिका प्रशासनाने येथील मालमत्ताधारकांच्या प्लॉटमधून ड्रेनेज योजनेचे काम सुरू केले. शासकीय मोजणी करून हद्द निश्चित केलेल्या खुणाही उद्ध्वस्त केल्या. यामुळे शुक्रवारी या भागातील नागरिकांनी कामास तीव्र विरोध केला. आमची जागा सोडून महापालिकेच्या जागेतूनच ड्रेनेज योजनेचे काम करावे, अशी भूमिका मांडली. सायंकाळपर्यंत या वादावर तोडगा निघाला नव्हता. याबाबत परिसरातील नागरिकांनी आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय, आमदार सुधीर गाडगीळ, उपमहापौर गजानन मगदूम यांना देण्यात आली आहे.