Sangli News : माघारीची उद्या मुदत; तिरंगी, चौरंगीची शक्यता

महायुती, महाविकास आघाडीच्या निर्णयाकडे लक्ष ः स्वबळावर मैदान मारण्याच्या हालचाली
Sangli Zilla Parishad
Sangli News
Published on
Updated on

सांगली ः जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची जोरदार धामधूम सुरू आहे. 61 गटात 590 आणि 122 गणांत 1 हजार 57 असे एकूण 1 हजार 647 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. अर्ज माघारीसाठी उद्या, मंगळवार, दि. 27 रोजी दुपारी तीनपर्यंत मुदत आहे. त्यामुळे उद्या निवडणुकीची दिशा स्पष्ट होणार आहे.

युती, आघाडी अजूनही गुलदस्त्यात आहे. कोणत्याच पक्षाकडून अधिकृत काहीच जाहीर केलेले नाही. महायुतीचे सर्व पक्ष स्वतंत्र लढतील, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाची युती होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचाही काही तालुक्यात समझोता होण्याची शक्यता आहे. अर्ज छाननीनंतर वैध ठरलेल्या उमेदवारांमध्ये आता माघार घ्यावी की थेट रिंगणात उतरावे, यावरून जोरदार खलबते सुरू आहेत. प्रत्येक गटात मनधरणी, दबावतंत्र, आश्वासने आणि समजूत काढण्याचे फेरे वाढले आहेत. मध्यरात्री दोन-तीनपर्यंत बैठकांचे सत्र सुरू असते. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजल्यापासून पुन्हा चर्चा झडत आहेत.

निवडणुकांना कसे सामोरे जायचे याबाबत महायुती आणि महाविकास आघाडीतही अंतिम तोडगा निघालेला नाही. कोणत्या गटात कोण उमेदवार असणार, कोणाला माघार घ्यावी लागणार, यावरून पक्षांतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. अनेक ठिकाणी अधिकृत उमेदवार जाहीर न झाल्याने बंडखोरांनी अर्ज कायम ठेवले आहेत. त्यामुळे पक्षनेत्यांसमोर बंड थोपविण्याचेे मोठे आव्हान आहे. ग्रामीण भागात इच्छुकांची संख्या मोठी असल्याने प्रत्येक गटात दोन ते तीन उमेदवार मैदानात आहेत. त्यामुळे ‌‘आपलाच उमेदवार टिकावा‌’ यासाठी स्थानिक नेते, आमदार, माजी पदाधिकारी सक्रिय आहेत. काही ठिकाणी थेट भेटीगाठी, तर काही ठिकाणी फोनाफोनी, बैठका आणि मध्यस्थी सुरू आहे. माघार घेतल्यास पुढील काळात संधी देण्याची ग्वाही, पदांची आश्वासने दिली जात असल्याची चर्चा उघड ऐकू येत आहे. दुसरीकडे, युती-आघाडीचा निर्णय रखडल्याचा फटका थेट निवडणूक गणितावर बसण्याची शक्यता आहे. वेळेत समन्वय न झाल्यास अनेक गटांत मैत्रीपूर्ण लढतीऐवजी थेट तिरंगी, चौरंगी लढत रंगण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मतांचे विभाजन होऊन अनपेक्षित निकाल लागण्याची भीती राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी, उद्या, मंगळवारी सकाळपासून तहसील कार्यालयाच्या परिसरात वर्दळ वाढण्याची शक्यता आहे. उमेदवारांसोबत समर्थक, पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांची गर्दी होण्याची शक्यता आहे. शेवटच्या क्षणीही माघारीचे नाट्य रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक उमेदवार ‌‘पाहू आणि ठरवू‌’ या भूमिकेत असल्याने शेवटच्या तासापर्यंत घोळ चालू शकतो. अर्ज माघारीचा टप्पा हा सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील खरी राजकीय कसोटी ठरत आहे. मंगळवारनंतर कोणाची ताकद किती, हे मतदारांच्या दरबारात ठरणार आहे. तोपर्यंत मात्र मनधरणीचे राजकारण आणि पडद्यामागील घडामोडी सुरू राहतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news