

कवठेमहांकाळ : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्य नियुक्तीचा मार्ग मोकळा करणारे राजपत्र नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. लवकरच शासन निर्णयही येण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. राजपत्रानुसार सांगली जिल्हा परिषदेत सहा सदस्य आणि 10 पंचायत समित्यांमध्ये मिळून 26 अशा एकूण 32 जणांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी मिळणार आहे. इच्छुकांसाठी मागच्या दरवाजातून स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रवेश करण्याची संधी चालून आली आहे. त्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
जिल्हा परिषदेसाठी निवडून आलेल्या सदस्यांच्या दहा टक्के किंवा किमान पाच सदस्य यापैकी जे अधिक असेल तितक्या जणांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी मिळणार आहे. तर पंचायत समितीत निवडून आलेल्या एकूण सदस्यांच्या संख्येच्या 20 टक्के किंवा किमान एक सदस्य यापैकी जे अधिक असेल तितक्या जणांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी मिळणार आहे. प्रशासनात विशेष ज्ञान आणि अनुभव असलेल्या व्यक्तींना स्वीकृत सदस्य म्हणून निवडले जाणार आहे. नामनिर्देशन करताना जिल्हाधिकारी मान्यताप्राप्त, नोंदणीकृत पक्ष तसेच गटांचे संख्याबळ विचारात घेतले जाणार आहे. नियुक्ती करण्यात आलेल्या स्वीकृत सदस्यांची नावे राज्य निवडणूक आयोग शासकीय राजपत्रात प्रसिद्ध करणार आहे.
राजकीय पक्ष किंवा गटानेत्यांशी विचारविनिमय करून त्यांच्या एकूण संख्या बळाच्या प्रमाणात स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीसाठी नावे निश्चित केली जाणार आहेत. प्रक्रियेत गटनेत्याला विशेष असे महत्त्व देण्यात आले आहे. गटनेत्याचा आदेश कायदेशीरदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीमध्ये गटनेतेच किंगमेकर ठरणार आहेत.
गटनोंदणीची मुदत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालाच्या अधिसूचनेपासून एक महिना होती. परंतु नुकत्याच जाहीर झालेल्या राजपत्रामध्ये गटनोंदणी करण्यासाठीची मुदत वाढविण्यात आलेली आहे. ही मुदत निकालाचे राजपत्र प्रसिद्ध झाल्यापासून तीन महिने करण्यात आली आहे. त्यानुसार 9 मेपर्यंत गटनोंदणी करता येणार आहे.