

सांगली : जिल्हा परिषदेमध्ये सत्तांतर झाले. काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादीचा झेंडा फडकला. अध्यक्षपदी संगीता संभाजीराव पाटील (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष) यांची, तर उपाध्यक्षपदी ऋषीकेश महेंद्र लाड (काँग्रेस) यांची निवड झाली. अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्या संगीता पाटील यांना 34, तर भाजपच्या स्वप्नाली मासाळ यांना 25 मते मिळाली. तसेच उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे ऋषीकेश लाड यांना 34, तर भाजपचे हिंमत जाधव यांना 25 मते मिळाली. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाची साथ मिळवत आघाडीने सत्ता खेचून आणली. भाजपचे सारे प्रयत्न फोल ठरले. निवडीनंतर काँग्रेससह दोन्ही राष्ट्रवादी पक्षांतील कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
जिल्हा परिषदेत बहुमतासाठी 31 संख्याबळ आवश्यक होते. सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाकडे 18 सदस्य होते. तसेच भाजप 16, काँग्रेस 11, शिवसेना 7, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष 6 आणि रयत क्रांती, जनसुराज्य शक्ती आणि शिवसेना (उबाठा) या पक्षांचा प्रत्येकी एक सदस्य निवडून आला होता. सत्तास्थापनेत शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष किंगमेकरच्या भूमिकेत होता.
अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी जिल्हा परिषदेतील वसंतदादा पाटील सभागृहात बुधवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. निवड प्रक्रियेसाठी पीठासीन अधिकारी मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे होते. त्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, प्रकल्प संचालिका नंदिनी घाणेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, शशिकांत शिंदे उपस्थित होते.
सुरुवातीला भाजपकडून अध्यक्ष पदासाठी स्वप्नाली मासाळ, तर शिंदे शिवसेनेच्या डॉ. शीतल बाबर यांनी अर्ज दाखल केले. तसेच उपाध्यक्ष पदासाठी जयराज पाटील आणि शिवसेनेचे हिंमत जाधव यांनी अर्ज भरला. महाविकास आघाडीकडून अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या संगीता पाटील, प्रतिमा मोरे यांनी अर्ज दाखल केले, तर उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे ऋषिकेश लाड आणि विद्या कुंभार यांचे अर्ज भरले. छाननीत सर्व अर्ज वैध ठरविण्यात आले.
अध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या डॉ. शीतल बाबर आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रतिमा मोरे; तर उपाध्यक्ष पदासाठी अर्ज भरलेल्या काँग्रेसच्या विद्या कुंभार व भाजपचे जयराज पाटील यांनी माघार घेतली. त्यामुळे अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या संगीता पाटील विरुद्ध भाजपकडून स्वप्नाली मासाळ, तर उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे ऋषिकेश लाड व शिंदे शिवसेनेचे हिंमत जाधव यांच्या लढत निश्चित झाली.
दुपारी दोन वाजता सभागृहात प्रत्यक्ष निवड प्रक्रिया सुरू झाली. हात उंचावून मतदान घेण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या संगीता पाटील यांना 34, तर भाजपच्या स्वप्नाली मासाळ यांना 25 मते पडली. संगीता पाटील यांना 9 मतांनी विजयी घोषित करण्यात आले. उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे लाड यांना 34, तर सेनेच्या जाधव यांना 25 मते मिळाली. त्यामध्ये काँग्रेसचे लाड 9 मतांनी विजयी झाले.
सभागृहात आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, माजी आ. मानसिंगराव नाईक, माजी आ. विक्रम सावंत, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, भाजपाचे आमदार सत्यजित देशमुख, आ. गोपीचंद पडळकर, माजी खासदार संजय पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, शिंदे शिवसेनेचे अमोल बाबर, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम उपस्थित होते. तसेच अध्यक्षांच्या दालनामध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, आमदार जयंत पाटील, सुरेश पाटील, मनोज शिंदे-म्हैसाळकर उपस्थित होते.
राष्ट्रवादीत फूट : दोन सदस्य युती, तर चारजण आघाडीसोबत
राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे सहा सदस्य निवडून आले आहेत. मात्र निवडणुकीत या पक्षात फूट पडल्याचे दिसले. या सहा सदस्यांपैकी दोन सदस्यांनी सभागृहात भाजपच्या बाजूने मतदान केले. त्यामध्ये मणेराजुरी गटातील शशिकांत जमदाडे आणि करगणी गटाचे विनायक मासाळ यांचा समावेश होतो. उर्वरित चार सदस्यांनी महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केले.
अन् वडिलांनी मारली मुलास मिठी
काँग्रेसचे ऋषीकेश लाड यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचे वडील महेंद्र लाड यांनी त्यांना सभागृहात घट्ट मिठी मारली. निवडणुकीतील विजय आणि उपाध्यक्ष पदाचाही विजय याच्या आनंदाचे प्रतिबिंब या मिठीमध्ये दिसून आले.