

सांगली : जिल्हा परिषदेच्यावतीने यांत्रिक बोटी खरेदी करण्यात येणार आहेत. मात्र विविध कारणास्तव अजूनही खरेदीचा गोंधळ सुरूच आहे. त्यामुळे पूर आलाच तर या बोटी उपलब्ध होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
सुमारे साडेतीन कोटी रुपयांतून ही यांत्रिक बोट खरेदी करण्यात येणार आहे. मात्र तिसर्यांदा फेर टेंडर काढण्यात आले आहे. त्यामुळे टेंडर फायनल होण्यास दहा जुलै होईल, त्यानंतर वर्क ऑर्डर व इतर सोपस्कार पूर्ण करून गावांना प्रत्यक्ष बोटी मिळण्यास किमान 10 ते 15 ऑगस्ट उजाडेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात पूर आलाच तर या बोटींचा उपयोग होणार कसा, असा सवाल उपस्थित होत आहे.
जिल्ह्यात 2019 साली आलेल्या महापुरावेळी बोट उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना जलसमाधी मिळाली. त्यामुळे बोट खरेदीचा निर्णय प्रशासनाने घेतला. आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत जिल्हा परिषदेकडे सुमारे 3 कोटी 35 लाख 17 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला. मात्र विविध कारणामुळे टेंडर प्रक्रिया राबविण्यास विलंब झाला. दोन दिवसांपूर्वी दुसर्यांदा प्रसिध्द केलेले टेंडर प्रशासनाने रद्द केले. प्रशासनाने आता तिसर्यांदा हे टेंडर प्रसिध्द केले आहे. मात्र सर्व सोपस्कार पार पाडून प्रत्यक्षात बोट गावात पोहोचणार कधी, असा सवाल उपस्थित होत आहे.
ही बोट खरेदी बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. एका वरिष्ठ अधिकार्यांनी, हे आपल्या विभागाचे काम नव्हे, यांत्रिक विभागाचे ते काम आहे त्यांना करू दे, असे बोलल्याची चर्चा आहे. मात्र बांधकाम विभागाकडून खरेदी प्रक्रिया राबविण्याचे सूचित करण्यात आले आले. त्यामुळे यंत्रणेसमोर देखील प्रश्न निर्माण झाला होता.