Sangli News : जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी राष्ट्रवादीत मतभेद?

स्थानिक नेते म्हणतात ‌‘निर्णय आम्ही घेणार‌’ ः जिल्हाध्यक्ष म्हणतात ‌‘प्रदेशाध्यक्षांच्या चर्चेनंतर निर्णय होणार‌’
Sangli Zilla Parishad
सांगली जिल्हा परिषद
Published on
Updated on

सांगली ः जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेत कोणाला पाठिंबा द्यायचा, यावरून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षामध्ये मतभेद असल्याची चर्चा आहे. माजी मंत्री शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, माजी आमदार विलासराव जगताप, माजी खासदार संजय पाटील यांनी जिल्हा परिषदेचा निर्णय आम्हीच घेणार, असे स्पष्ट केले असताना दुसरीकडे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, मात्र प्रदेशाध्यक्षांच्या चर्चेनंतर अंतिम निर्णय होईल, असे सांगत असल्याने पक्षांतर्गत मतभेदाच्या चर्चा जोरकसपणे सुरू झाल्या आहेत.

गटनेता नोंदणीसाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रमुख नेते सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्रित आले होते. नोंदणीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील उपस्थित नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीत माजी खासदार संजय पाटील यांनी त्यांच्यावर टीका करत मतभेद उघड केले. त्यामुळे पाठिंब्याच्या मुद्द्यावरून पक्षात अंतर्गत वाद उफाळल्याचे समोर आले.

माजी खासदार संजय पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख हे पक्षातील वरिष्ठ नेते महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याच्या मानसिकतेत असल्याची चर्चा आहे. मात्र जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसारच निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका घेतली आहे. स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घ्यावा, असे प्रदेशाध्यक्षांनी सूचित केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

सत्ता स्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी चार दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईत बैठक बोलवली होती. मात्र या बैठकीला पक्षातील कोणतेही नेते गेले नाहीत. त्यामुळे सत्ता स्थापनेबाबत मतभेद असल्याचे चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेत नव्याने निवडून आलेल्या सदस्यांचा गट स्थापन करण्यात आला आहे. गटस्थापनेच्या अर्जावर जिल्हाध्यक्ष म्हणून आवश्यक त्या ठिकाणी आपण सही केल्याचे निशिकांत पाटील यांनी स्पष्ट केले. माजी आमदार विलासराव जगताप यांनी दूरध्वनीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितल्याने आपण तेथे गेलो होतो. गटनोंदणी प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार गट स्थापन करण्यात आला. गटस्थापनेत माझी सही आवश्यक होती. त्याबाबत माजी आमदार विलासराव जगताप यांचा फ ोन आल्याने गटनोंदणीस मी उपस्थित होतो. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचे मत विचारात घेऊन श्रेष्ठी योग्य निर्णय घेतील. त्याचा पदाधिकारी, सदस्य आदर करतील.
-निशिकांत भोसले-पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news