Sangli Zilla Parishad
सांगली जिल्हा परिषद

Sangli News : दुरंगी-तिरंगी काटा लढती; आजपासून धुरळा

61 गटात 211, तर 122 गणांमध्ये 340 उमेदवार ः 1,084 जणांची माघार; प्रचाराचा धडाका
Published on

सांगली : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी मंगळवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरच्या दिवशी जिल्हा परिषद गटात 374 आणि गणात 710, असे एकूण 1 हजार 84 उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात आले. जिल्हा परिषदेच्या 61 जागांसाठी 211, तर पंचायत समितीच्या 122 जागांसाठी 340 उमेदवार रिंगणात आहेत. बहुसंख्य गट, गणांमध्ये दुरंगी-तिरंगी लढती होणार आहे. भाजप, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादीसह घटक पक्ष आणि स्थानिक आघाडीत आता निवडणुकांचे धूमशान चांगलेच रंगणार आहे. काही ठिकाणी समझोता एक्स्प्रेस दिसत आहे. जिल्हाभरात आज, बुधवारपासून प्रचाराचा धुरळा उडणार आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्यासाठी मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत होती. उमेदवारी अर्ज माघारीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून रहिले होते. सर्वच तालुक्यांमध्ये दुपारी तीन वाजेपर्यत अर्ज माघारीचे नाट्य चांगलेच रंगले. दुपारी तीन वाजता अर्ज माघारीची मुदत संपली आणि सायंकाळी सहापर्यत लढतीचे चित्र स्पष्ट झाले. बंडोबांना थंड करण्यात नेतेमंडळींना अपयश आल्याचे दिसते. त्यामुळे अनेक गट, गणांत दुरंगी, तर काही ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे.

वाळवा तालुक्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, अशी थेट लढत होत आहे. भाजपा 6, राष्ट्रवादी अजित पवार 1, शिवसेना शिंदे गट 2 जागा लढत आहे, तर एका ठिकाणी आघाडी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सर्व ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत, काँग्रेसने बोरगाव गटात स्वतंत्र उमेदवार उभा केल्याने महाविकास आघाडीत फूट पडली आहे. शिराळा तालुक्यात जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि माजी आ. शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षातर्फे उमेदवार दिले आहेत. त्यांच्याविरोधात भाजपचे आ. सत्यजित देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक यांनी आव्हान उभे केले आहे. येथे भाजपसोबत शिंदे सेनेने हातमिळवणी केली आहे.

मिरज तालुक्यात भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी, अशी लढत होत आहे. कवठेपिरान जिल्हा परिषद गट स्वाभिमानी शेतकरी संघटना लढवत आहे. जनसुराज्य पक्षानेही उमेदवार उभे केले आहेत. खा. विशाल पाटील, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजपविरोधात तडगे उमेदवार दिले आहेत. भाजपचे आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ यांनी निवडणुकीत ताकद पणाला लावली आहे. पलूस आणि कडेगाव या दोन्ही तालुक्यात भाजपचे माजी आ. पृथ्वीराज देशमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यात समझोता झाला. तेथे भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होईल. काँग्रेस नेते आ. डॉ. विश्वजित कदम यांनी भाजपला जोरदार आव्हान देण्याचा प्रयत्न सुरु आहे.

खानापूर-आटपाडी तालुक्यात महायुतीत फूट पडली. खानापूर तालुक्यात भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढत होत आहे. आटपाडीत भाजपाविरोधात शिवसेना शिंदे गट अशी लढत होत आहे, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने शिंदे सेनेसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही तालुक्यात आ. सुहास बाबर यांच्याविरोधात भाजपचे आ. गोपीचंद पडळकर, माजी सभापती ब्रह्यानंद पडळकर, वैभव पाटील यांनी ताकद लावली आहे.

जत तालुक्यात भाजप विरुद्ध सर्वपक्षीय आघाडीत सामना होईल. भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार विक्रमसिंह सावंत, राष्ट्रवादीचे नेते, माजी आ. विलासराव जगताप यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन भाजपाविरोधात आघाडी केली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात राष्ट्रवादी अजित पवार विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार अशी लढत होणार आहे. आ. रोहित पाटील यांच्याविरोधात माजी खा. संजय पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे, जनसुराज्यच्या अनिता सगरे यांनी एकत्र येऊन आव्हान दिले आहे. तासगाव तालुक्यात आ. रोहित पाटील आणि माजी खासदार संजय पाटील यांच्यात थेट लढत होईल. राष्ट्रवादी शरद पवार विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार पक्षात मुख्य सामना होणार असला तरी भाजपकडूनही स्वतंत्र उमेदवार देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news