

मिरज : सांगली जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागातील अधीक्षक नारायण विष्णू माळी यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील 2 लाख 19 हजारांचा मुद्देमाल लुटला. नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यावर रविवारी रात्री ही घटना घडली. नारायण माळी यांनी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी तिघा संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.
नारायण माळी रविवारी देवदर्शनासाठी गेले होते. तेथून ते रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास सांगलीकडे येण्यास निघाले. मध्यरात्री ते मिरजजवळ आल्यानंतर त्यांच्या कारचे टायर पंक्चर झाले. त्यामुळे ते मिरजजवळ महामार्गाच्या सेवा रस्त्यावर थांबले होते.
यावेळी तिघे अनोळखी त्यांच्या कारजवळ आले. चोरट्यांनी माळी याच्या कारचा दरवाजा उघडून माळी यांच्या पत्नीच्या गळ्याला चाकू लावला. सर्व दागिने काढून द्या, अन्यथा मारून टाकू, अशी धमकी दिली. त्यानंतर चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोख रक्कम, घड्याळ, हिर्याची अंगठी असा दोन लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून पोबारा केला. याबाबतची महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद आहे.