

संजय खंबाळे
सांगली ः जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढावे, या उद्देशाने मिरजेतील मार्केट यार्ड येथे (पंचायत समिती विश्रामगृहाच्या पश्चिम बाजूस) पाच वर्षांपूर्वी सुमारे 70 लाख रुपये खर्च करून 12 गाळे उभारण्यात आले. मात्र शौचालयासह किरकोळ कामाअभावी हे गाळे वापराविना पडून आहेत. निधी अभावी उत्पन्न वाढीचे स्वप्न आज धूळखात आहेत. त्यामुळे यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक मुळात कमी आहे. तसेच हे अंदाजपत्रक शासनाकडून मिळणाऱ्या निधीवर अवलंबून आहे. स्वीय निधीचा भक्कम आधार मानले जाणारे ठेवीवरील व्याजाचे उत्पन्न आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे उत्पन्नाचे स्रोत वाढवणे हा एकमेव पर्याय आहे. मोकळ्या जागा विकसित करणे, गाळे उभारून भाड्याने देणे असे पर्याय आहेत. याच उद्देशातून मिरजेतील मार्केट यार्डमध्ये गाळे उभारणीसाठी 2019 मध्ये स्वीय निधीतून तरतूद करण्यात आली. दि. 15 मे 1019 च्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. एकूण 12 गाळे उभारणीसाठी दि. 11 सप्टेंबर 1019 मध्ये कार्यारंभ आदेशही देण्यात आला. दि. 10 सप्टेंबर 2020 मध्ये 75 लाख 23 हजार रुपये खर्च करून 12 गाळ्यांचे काम पूर्ण करण्यात आले.
दरम्यान, गाळे उभारणीनंतर त्यांच्या मूलभूत सुविधां उपलब्ध नसल्याचे समोर आले. त्यानंतर शौचालयाच्या बांधकामासाठी निधीची मागणी करण्यात आली. जानेवारी 2022 मध्ये 5 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र यानिधीतून शौचालयाची केवळ इमारत झाली. उर्वरित काम अपूर्ण राहिले. दुकानगाळ्यासमोरील गेट, प्लेविंग ब्लाँकसह विद्युत जोडणीचे काम अजूनही बाकी आहे. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले गाळे वापराविना धूळखात पडून आहेत. किरकोळ निधी अभावी गाळे वापराविना असल्याने प्रशासनाच्या नियोजन शक्तीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पदाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणात गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी होत आहे.