Sangli ZP : जिल्हा परिषदेला ३०५ शिक्षकांची कुमक

२ पासून कागदपत्रांची पडताळणी; दुसऱ्या टप्प्यात आणखी १७४ शिक्षक मिळणार
Sangli ZP
Sangli ZPPudhari
Published on
Updated on

सांगली : जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची कमतरता आता काही प्रमाणात दूर होणार आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात तब्बल ३०५ शिक्षक उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्रामीण भागातील शाळांना मोठा दिलासा मिळणार आहे. उपलब्ध शिक्षकांची कागदपत्रे पडताळून तातडीने समुपदेशनाद्वारे रिक्त शाळांमध्ये नियुक्ती केली जाणार आहे. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात आणखी १७४ शिक्षक जिल्हा परिषदेला मिळणार आहेत.

जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये उपशिक्षकांची सुमारे ६०० पदे रिक्त आहेत. त्यापैकी ४७९ पदे भरण्याची मागणी जिल्हा परिषदेने शासनाकडे केली होती. प्राथमिक शाळांमधील रिक्त पदांच्या तुलनेत ८० टक्के पदे भरण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात ३०५ शिक्षक उपलब्ध झाले आहेत.

उपलब्ध झालेल्या शिक्षकांमध्ये मराठी माध्यमासाठी २७१, कन्नड माध्यमासाठी ३१ आणि उर्दू माध्यमासाठी तीन शिक्षकांचा समावेश आहे. या शिक्षकांच्या नियुक्तीसाठी २ सप्टेंबरपासून कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर समुपदेशन प्रक्रिया राबविण्यात येईल. समुपदेशनावेळी केवळ रिक्त पदांचा विचार न करता संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या, विषयांची गरज आणि उपलब्ध मनुष्यबळ यांचा विचार केला जाणार आहे. त्यानुसार शिक्षकांना योग्य त्या शाळांमध्ये नियुक्ती देण्यात येणार आहे. नियुक्ती मिळाल्यानंतर शिक्षकांनी संबंधित शाळेत तातडीने रुजू व्हावे, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

गुणवत्तावाढीच्या प्रयत्नांना मिळणार बळ

जिल्ह्यात मॉडेल स्कूल योजना राबविण्यात येत असून, शाळांमध्ये भौतिक सुविधा निर्माण करण्याबरोबरच शैक्षणिक गुणवत्तावाढीवरही जिल्हा परिषदेकडून भर दिला जात आहे. उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती ऋषीकेश लाड यांनी शाळांच्या गुणवत्तेला प्राधान्य दिले आहे. मात्र, अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने नियमित अध्यापनावर परिणाम होत होता. आता नव्या शिक्षकांमुळे ही समस्या काही प्रमाणात दूर होण्याची अपेक्षा आहे.

विशेषतः ग्रामीण भागातील शिक्षकांची कमतरता असलेल्या शाळांना याचा फायदा होणार असून, भाषा, विज्ञान यांसह विविध विषयांचे अध्यापन अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांना नियमित आणि गुणवत्तापूर्ण अध्यापन मिळण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वाची ठरणार आहे.

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात ३०५ शिक्षक उपलब्ध झाले असले तरी शिक्षकांची कमतरता पूर्णपणे दूर झालेली नाही. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात आणखी १७४ शिक्षक जिल्हा परिषदेला उपलब्ध होणार आहेत. दोन्ही टप्प्यांतील नियुक्त्या पूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची कमतरता मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news