Sangli ZP election : बहुमताच्या जुळणीसाठी युती, आघाडीची खलबते

भाजपच्या बैठकीत चर्चा ः दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेसच्याही हालचाली; शिवसेना ‌‘वेट अँड वॉच‌’च्या भूमिकेत
Sangli ZP Election
बहुमताच्या जुळणीसाठी युती, आघाडीची खलबते Pudhari
Published on
Updated on

सांगली ः जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी समोर आल्यानंतर सत्ता स्थापनेचे गणित गुंतागुंतीचे बनले आहे. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने जिल्हा परिषदेत ‌‘त्रिशंकू‌’ अवस्था निर्माण झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून सत्ता स्थापनेसाठी पडद्यामागे जोरदार खलबते सुरू आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत जिल्ह्याचे राजकारण नवीन वळण घेण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला 16, काँग्रेसला 11, राष्ट्रवादीला 6, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 18, शिवसेनेला 7 जागा मिळल्या आहेत, तर शिवसेना (उबाठा), जनसुराज्य शक्ती आणि रयत क्रांती संघटनेला प्रत्येकी 1 जागा मिळाली आहे. सत्ता स्थापनेसाठी किमान 31 जागांची गरज आहे. मात्र कोणत्याही पक्षाकडे स्वतंत्रपणे हा आकडा नसल्याने राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची झाली आहेत. महायुतीकडे भाजपच्या 16, शिवसेनेच्या 7 आणि राष्ट्रवादी 6, जनसुराज्य शक्ती 1, रयत क्रांती संघटना 1, अशा एकूण 31 जागा आहेत. त्यांच्याकडे बहुमताचे संख्याबळ आहे, मात्र काही भागात स्थानिक पातळीवर नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये वाद आहेत. त्यामुळे त्यांची मनधरणी करणे, हे शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर आव्हान ठरणार आहे.

सांगलीत आमदार सत्यजित देशमुख, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. गोपीचंद पडळकर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत मित्रपक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय झाल्याची माहिती मिळाली. भाजप नेते, पालकमंत्री चंद्रकांत पाटील बुधवारी सांगलीत येणार आहेत, ते भाजपसह महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. महाविकास आघाडीच्या गणितानुसार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या 18 जागा, काँग्रेस 11 आणि शिवसेना (उबाठा) 1 अशा मिळून 30 जागा होतात. मात्र बहुमतासाठी आणखी एका सदस्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्यांशी संवाद साधत आहेत. राष्ट्रवादीचे नेते, माजी खासदार संजय पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे दोघेही आघाडीसोबत जाण्यास तयार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे काही नेते महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार आहेत. मात्र याबाबतचा अधिकृत निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल, असे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आले. तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांची शिवसेनेसोबतदेखील सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रवादीचा (अजित पवार) पाठिंबा घेणार, की शिवसेनेची साथ घेणार, याबाबत उत्सुकता आहे. शिवसेनेने सध्या तरी ‌‘वेट अँड वॉच‌’ची भूमिका घेतली आहे.

निकालानंतर सत्तास्थापनेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचे वरिष्ठ पातळीवरील नेते सक्रिय झाले आहेत. सांगलीपासून ते मुंबईपर्यंत चर्चा सुरू असल्याचे समजते. ‌‘मनधरणी‌’ आणि ‌‘जोडणी‌’चे प्रयत्न सुरू आहेत. काही ठिकाणी सदस्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. ‌‘फुटीरता‌’ टाळण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या राजकारणात सध्या प्रचंड उत्सुकता आणि तणावाचे वातावरण आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्येही चर्चा रंगल्या आहेत. कुणाची सत्ता येणार? याबाबत गावा-गावांत राजकीय अंदाज बांधले जात आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष पद आणि सभापती पदाच्यादृष्टीनेही मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news