

सांगली ः जिल्हा परिषदेमधील सर्व विभागामध्ये दोन महिन्यांपासून सुमारे 350 कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी सुरू आहे. मात्र या हजेरीची तपासणी झाली नाही. त्यामुळे ‘बायोमेट्रिक नावाला अन् पगार लेटकमिंगला’, अशी अवस्था आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी ‘आव-जाव घर तुम्हारा’, असे वर्तन करत असल्याची चर्चा आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी 10 वाजता प्रवेशद्वार बंद करून, उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना दणका दिला. त्यांनी सुरुवातीला समज देऊन प्रवेश दिला. त्यानंतर काही दिवस दररोज सकाळी 9.45 वाजता प्रवेशद्वार बंद करण्यात येत होते. उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोंद घेऊन 10.15 वाजता प्रवेशद्वार खोलले जात होते. त्यामुळे अनेक कर्मचारी धावत-पळत झेडपीत वेळेत येत होते.
कर्मचाऱ्यांना शिस्त लागण्यासाठी बायोमेट्रिक प्रणाली सुरू केली. सकाळी आणि सायंकाळी दोन वेळा इन-आऊट करणे बंधनकारक केले. तसेच महिन्याच्या शेवटी याचा अहवाल केला जाईल. वेळेत न येणाऱ्यावर कारवाईचा इशारा दिला. याची जबाबदारी संबंधित विभागाच्या प्रमुखावर देण्यात आली. मात्र दोन महिन्यात बायोमेट्रिकची तपासणीच झाली नाही. त्यामुळे ही प्रणाली केवळ दिखावा आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. अध्यक्षा संगीता पाटील, उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालण्याची मागणी होत आहे.