Sangli Crime : आर्थिक आमिषाने तरुणावर चाकूहल्ला

गिरगाव येथील घटना; तिघांवर उमदी पोलिसांत गुन्हा
Crime News
चाकूहल्लाFile Photo
Published on: 
Updated on: 

जत : पैसे येणार असल्याचे सांगून दुचाकीवरून नेऊन तरुणावर चाकूने वार करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. गिरगाव (ता. जत) हद्दीतील अमोघसिद्ध मंदिराजवळ ही घटना घडली. या हल्ल्यात शिवाजी यशवंत शिंगाडे (वय २८, रा. जालिहाळ बुद्रुक) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या चेहऱ्यावर १६ ते १७ टाके पडले आहेत. त्यांच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी उमदी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत जखमी शिवाजी शिंगाडे यांनी उमदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुखदेव कृष्णा चौगुले, समाधान सुखदेव चौगुले आणि दादा सुखदेव चौगुले (सर्व रा. जालिहाळ बुद्रुक) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, संशयित सुखदेव चौगुले याने 'माझे पैसे येणार आहेत, चल आपण जाऊ' असे सांगून शिंगाडे यांना दुचाकीवरून गिरगाव परिसरात नेले. तेथे त्याने समाधान व दादा चौगुले यांना बोलावून घेतले. त्यानंतर सुखदेव याने चाकूने शिंगाडे यांच्या डाव्या गालावर वार केला, तर समाधान याने उजव्या डोळ्याजवळ मारहाण केली. त्यानंतर तिघांनी लाथा-बु‍क्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली. जिवे मारण्याची धमकी दिली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शिंगाडे यांना प्रथम स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना मिरज शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. याप्रकरणी उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news