

सांगली : पन्नास हजार रुपयांच्या मुद्दलापोटी ९ हजार रुपये व्याज देऊनही आणखी ६१ हजार रुपये जादा व्याजाची मागणी करत तरुणाला मारहाण केल्याचा प्रकार विजयनगर-कुपवाड रस्त्यावरील अष्टविनायकनगर येथे घडला आहे. याप्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत किशोर तुळशीदास हंकारे (वय २१, रा. कोथळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी धनाजी गणपती दुधाळ (रा. अष्टविनायकनगर, गल्ली नं. २, सांगली) आणि त्याच्या पाच अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादी हंकारे याने संशयित दुधाळ याच्याकडून ५० हजार रुपये घेतले होते आणि त्याबदल्यात आपली दुचाकी (एमएच ५१ बी ६५०८) गहाण ठेवली होती. दि. १६ नोव्हेंबररोजी किशोरने ५० हजार रुपये रोख परत केले, तसेच दि. १७ नोव्हेंबररोजी पहाटे ऑनलाईन पद्धतीने ९ हजार रुपये व्याजही दिले.
दि. १७ नोव्हेंबररोजी किशोरने जादा पैसे देण्यास नकार दिल्याने धनाजी दुधाळ व त्याचे पाच साथीदार मोटारीतून तेथे आले. त्यांनी किशोरला गाठून दमदाटी केली. धनाजीने हातातील काठीने किशोर याच्या डाव्या हातावर मारहाण केली, तर इतर पाच जणांनी खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणाचा अधिक तपास संजयनगर पोलिस करत आहेत.