

चिकोडी : सांगलीहून चिकोडीकडे दुचाकीवरून जाणार्या तरुणाला पोलिसांंनी अडवून हेल्मेट नसल्याच्या कारणावरून तरुणाला व आईला मारहाण व दमदाटी करत उलट तरुणावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषिकेश लिंबीगिडद व त्याची आई सुशीला यांनी हा आरोप केला आहे.
याबद्दल जखमी तरुणाने दिलेली माहिती अशी की, सांगलीमध्ये राहणारे ऋषिकेश लिंबीगिडद व त्याची आई सुशीला या आजोळ असलेल्या चिकोडी तालुक्यातील बंबलवाड गावाकडे दुचाकीवरून जात होते. अंकली पोलिस ठाण्यासमोर पोलिसांनी दुचाकी अडवली. हेल्मेट न घातल्यामुळे पाचशे रुपये दंड देण्यास सांगितले. पण माझ्याकडे रक्कम कमी असून दोनशे रुपये घ्या असे त्या तरुणाने सांगितले. पण पोलिसांनी शिवीगाळ करत, कपडे फाडून मारहाण करत पोलिस स्थानकात नेले. त्या ठिकाणी पाचहून होऊन अधिक पोलिसांनी बेदम मारहाण केली आहे. माझी काहीही चूक नसताना विनाकारण मला व माझ्या आईला मारहाण केली केल्याचे सांगितले. त्यानंतर मेडिकलसाठी घेऊन जात असताना रस्त्यात पाडून पुन्हा बेदम मारहाण केली. यावेळी माझी आई सोडविण्यास मध्ये आली असता तिलादेखील काठीने मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता माझ्या आईच्या पर्समधील दहा हजाररुपये देखील काढून घेतले. त्यानंतर पोलिसांनी स्वतः दवाखान्यात दाखल करून नवीन टी-शर्ट घालून तहसीलदारांसमोर हजर केले. शेवटी माझ्यावर गुन्हा दाखल करून पोलीस ठाण्यात डांबून ठेवले. त्यानंतर आमच्या वकिलामार्फत चिकोडी तहसीलदारांकडून जामीन मिळविला आहे. अंकली स्थानकाच्या पोलिसांवर तक्रार दाखल करणार असल्याचे ऋषिकेश व आई सुशीला यांनी माध्यमांना सांगितले.
याविषयी अंकली पोलिस स्थानकाच्या अधिकार्यांशी संपर्क साधला असता हेल्मेट नसल्यामुळे दुचाकी थांबल्यानंतर त्याने पोलिस कर्मचार्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करताना पडल्यामुळे त्याला लागले आहे, असे सांगत सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग व सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात आले.